शुक्रवार २० जून – अहिल्यानगर:
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज (शुक्रवारी) केलेल्या यशस्वी कारवाईत राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे (वय ५७) यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. एका सेवानिवृत्त ग्रामसेवकाकडून त्यांच्या बाजूने अहवाल पाठवण्यासाठी मुंडे यांनी ही लाच मागितली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ५८ वर्षीय तक्रारदार हे सेवानिवृत्त ग्रामसेवक आहेत. राहुरीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. तक्रारदार सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्यावरील दोषारोप पत्राचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे पाठवणे अपेक्षित होते. हा अहवाल तक्रारदारांच्या बाजूने पाठवण्यासाठी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी स्वतः दहा हजार रुपयांची लाच मागितली आणि आज (२० जून) ती स्वीकारली.
तक्रारदाराच्या तक्रारीनंतर अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक, आणि ड्रायव्हर अरुण शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. लाचेची रक्कम स्वीकारताच मुंडे यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून लाचेची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.
या प्रकरणी गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे (नेमणूक पंचायत समिती राहुरी, रा. प्लॉट नंबर 68, 69 केशवकुंज रोड, श्रीराम चौक, ऐश्वर्या नगरी अहिल्यानगर) यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

