मुंबई, 7 जुलै 2025:
महाराष्ट्रात वकिलांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संरक्षणासाठी तातडीने कायदा लागू करण्याची मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी आज विधान परिषदेत केली. नाशिक जिल्ह्यातील ॲड. रामेश्वर बोऱ्हाडे यांच्यावर नुकत्याच झालेल्या प्राणघातक हल्ल्याची आणि गेल्या वर्षी अहमदनगर जिल्ह्यात आढाव दांपत्याच्या निर्घृण हत्येची उदाहरणे देत तांबे यांनी या कायद्याची गरज अधोरेखित केली.

आमदार तांबे यांनी सभागृहात सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात मागील वर्षी ॲड. राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी मनीषा आढाव यांची हत्या झाली होती. या घटनेनंतर वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न राज्यभर ऐरणीवर आला होता. त्यावेळीही 1 मार्च 2024 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वकील संरक्षणाबाबत कायदा तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र तो प्रलंबित राहिला.
2 जुलै 2025 रोजी नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी येथे ॲड. रामेश्वर बोऱ्हाडे यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याने वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे.

तांबे यांनी निदर्शनास आणून दिले की, बिहार आणि झारखंडसारख्या राज्यांनी वकिलांसाठी संरक्षण कायदा केला आहे, तर पुरोगामी महाराष्ट्रात मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांनी गृहमंत्री आणि विधी मंत्र्यांकडे या हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि राज्यभरातील वकिलांच्या संरक्षणासाठी तातडीने कायदा करण्याची मागणी केली.
सभापती प्रा. राम शिंदे यांनी याबाबत सरकारला निवेदन देण्याची सूचना केली असून, सरकारने आमदार तांबे यांच्या प्रश्नावर या संरक्षण कायद्याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.

आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत वकिलांच्या संरक्षणाचा मुद्दा मांडल्याबद्दल महाराष्ट्र राज्य बार असोसिएशनसह अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि संगमनेर बार असोसिएशनने त्यांचे अभिनंदन केले आहे.

