
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त, जळगाव:
एका महिला तलाठ्याला 25 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. वडिलोपार्जित शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील जुन्या नोंदी कमी करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ही कारवाई केली असून, या प्रकरणी तलाठ्यासह एका रोजगार सेवक आणि एका मध्यस्थालाही अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या सात भावंडांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर काही जुन्या नोंदी होत्या. त्या कमी करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी अर्ज केला होता. तलाठी मोमीन दिलशाद अब्दुल रहिम हिने अर्ज स्वीकारला, मात्र पोचपावती दिली नाही. नंतर पाठपुरावा केला असता, तिने कामासाठी 25 हजार रुपयांची मागणी केली. तिने तक्रारदाराला गावातील ग्रामरोजगार सेवक वाडीलाल पवार याच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.

त्यानुसार, तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. एसीबीने सापळा रचून चाळीसगाव तहसील कार्यालयाबाहेर तलाठी मोमीन दिलशाद, रोजगार सेवक वाडीलाल पवार आणि मध्यस्थ दादा जाधव यांना 25 हजार रुपयांची लाच घेताना पकडले. या तिघांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लाचखोरीची प्रकरणे वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन महसूल सहाय्यक आणि जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आले होते. या घटनेमुळे शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील एसीबीच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.


