

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन:
अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी शनिवारी बुलढाण्यात घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना थेट ‘महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायद्यांतर्गत’ (MPDA) गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
या बैठकीत त्यांनी अवैध गौण खनिज उत्खननात सामील असलेल्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही लक्ष ठेवून कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच, यापुढे कोणत्याही मंत्री, खासदार किंवा आमदारांच्या शिफारशींना न जुमानता कारवाई करण्याचे निर्देश देत, यापुढे जिल्ह्यात अवैध वाळू उपसा झाल्यास जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
यावेळी मंत्री बावनकुळे यांनी जिल्ह्यातील वाळू साठे आणि घाटांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी ‘एमआरसॅक’ यंत्रणेचा वापर करून पाहणी करावी, असे त्यांनी सांगितले. नवीन वाळू धोरणानुसार कार्यवाही करून गरीब आणि सर्वसामान्यांना घरकुलांसाठी वाळू उपलब्ध करून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. याशिवाय, अवैध वाळू वाहतूकदारांकडून थकीत दंड तातडीने वसूल करावा, गायरान जमिनींवरील घरांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी व्यापक मोहीम राबवावी आणि शासकीय जमिनी बळकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असेही ते म्हणाले. पाणंद व शिवार रस्ते मोकळे करून त्यांचे नकाशे गावनिहाय दर्शनी भागात लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन, विशेष सहाय योजना व ‘ॲग्रीस्टॅक’ अंतर्गत नोंदणीसाठी गावपातळीवर मोहीम राबवून शेतकऱ्यांच्या घरोघरी भेटी देणे, तसेच पोटखराब, कजाप, सातबारा दुरुस्तीची कामे लवकर पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले. डिसेंबर महिन्यापर्यंत भोगवटादार वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
दरम्यान, जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘ई-चावडी’ आणि ‘जिवंत सातबारा’ या दोन्ही मोहिमांचे समाधानकारक अंमलबजावणीबद्दल मंत्री बावनकुळे यांनी कौतुक केले. या मोहिमेचा दुसरा टप्पा लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीला कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले, आमदार संजय गायकवाड, आमदार मनोज कायंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.



यावेळी मंत्री बावनकुळे यांनी जिल्ह्यातील वाळू साठे
दरम्यान, जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या