महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
अकोले: आपल्याच मित्राच्या गळ्यातील सोन्याची चेन पाहून त्याची नियत फिरली आणि त्याने वेशांतर करून चोरी केली. मात्र, राजूर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तपास करून आरोपी मित्राला अटक केली. त्याच्याकडून चोरीला गेलेल्या सुमारे साडेचार लाख रुपयांच्या दोन सोन्याच्या चेन जप्त करण्यात आल्या आहेत. मौजमजा करण्यासाठी ही चोरी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
सागर दिगंबर पवार (रा. राजूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने त्याचा मित्र विष्णू रामभाऊ हेकरे यांच्याच घरात रविवारी मध्यरात्री चोरी केली होती.
पहाटेच्या सुमारास विष्णू हेकरे रात्री झोपले असताना, त्यांच्या दरवाजावर थाप मारण्यात आली. त्यांनी दरवाजा उघडताच तोंडाला रुमाल बांधलेला एक तरुण घरात घुसला. त्याने हेकरे यांना ढकलून स्वयंपाकघरात नेले आणि त्यांच्या गळ्यातील सुमारे पाच तोळ्याची सोन्याची चेन हिसकावून पळ काढला.
या घटनेनंतर विष्णू हेकरे यांनी राजूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. तांत्रिक पुरावे आणि खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी सागर पवार याला ताब्यात घेतले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेल्या ४ लाख ३९ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या चेन जप्त केल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर पवार आणि फिर्यादी विष्णू हेकरे हे चांगले मित्र आहेत. विष्णूच्या गळ्यातील चेन पाहून सागरची नियत बिघडली होती. नशेत असताना मी त्याने ही चोरी केली आणि ओळख लपवण्यासाठी वेशांतर केले. अधिक मौजमजा करण्याच्या हेतूने त्याने हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.