महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
अहिल्यानगर/संगमनेर: संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसा घरफोड्या करणाऱ्या एका सराईत आरोपीला आणि त्याच्या महिला साथीदाराला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ४८ तासांत जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेला ११,७९,१४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
कौठे कमळेश्वर येथील रहिवासी सोमनाथ शिवाजी भडांगे हे एका कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील ९,९२,२८० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती.
या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली. या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, गणेश लोंढे, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, भाऊसाहेब काळे, अमृत आढाव, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजाळ, सुनील मालणकर, प्रशांत राठोड, महादेव भांड, चंद्रकांत कुसळकर, तसेच महिला पोलीस अंमलदार सारिका दरेकर आणि ज्योती शिंदे यांचा समावेश होता.
पथकाने घटनास्थळी भेट देऊन आरोपींची माहिती गोळा केली असता, हा गुन्हा टोण्या उर्फ सोपान भाऊसाहेब काळे (वय २०, रा. लखमापुरी, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचे समोर आले. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे टोण्या उर्फ सोपान काळे याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली.
चौकशीदरम्यान, टोण्या उर्फ सोपान काळे याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने त्याचे साथीदार राहुल भाऊसाहेब काळे आणि महिला साथीदार देवका अग्नेश चव्हाण यांच्या मदतीने हा गुन्हा केला. चोरी केलेले दागिने त्याने घराच्या जवळच जमिनीत पुरून ठेवल्याचेही त्याने सांगितले. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन ११,७९,१४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
आरोपी टोण्या उर्फ सोपान भाऊसाहेब काळे हा रेकॉर्डवरील आरोपी असून, त्याच्यावर यापूर्वी अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, आणि बीड जिल्ह्यांमध्ये खून, जबरी चोरी आणि घरफोडीचे असे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत.
Post Views: 1,951