

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
शिर्डी: पत्नी माहेरी निघून गेल्याच्या कौटुंबिक वादातून एका बापाने आपल्या चार चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शिर्डीजवळ घडली आहे. राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारात एका विहिरीत पाच मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण काळे (वय ३०) याने आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही जीवन संपवलं.
अरुण काळे हा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चिखली कोरेगाव येथे राहत होता. त्याला तीन मुले आणि एक मुलगी होती. गेल्या काही दिवसांपासून घरात सुरू असलेल्या वादामुळे त्याची पत्नी आठ दिवसांपूर्वी त्याला सोडून माहेरी येवला तालुक्यात गेली होती. याच कारणातून अरुणने दारूच्या नशेत हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
ही घटना कोऱ्हाळे गावाच्या शिवारात घडली. अरुण काळेने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली होती. शिवानी अरुण काळे (वय ८), प्रेम अरुण काळे (वय ७), वीर अरुण काळे (वय ६) आणि कबीर अरुण काळे (वय ५) अशी मयत मुलांची नावे आहेत. अरुणने या चौघांना विहिरीत ढकलून दिलं आणि त्यानंतर स्वतःचे हातपाय दोरीने बांधून विहिरीत उडी घेतली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर बचाव पथकाने तात्काळ शोधकार्य सुरू केले. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शिर्डीचे पोलीस उपाधिक्षक शिरीष वमणे, राहात्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. ४५ फूट खोल विहिरीतून आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. पावसामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत. पती-पत्नीमधील वादामुळे अख्खं कुटुंब संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिकदृष्ट्या हा आत्महत्येचा प्रकार असला तरी पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत.
दरम्यान या दुर्घटनेतील पाचही मृतदेह मिळून आले असल्याची व राहता पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलीआहे.



ही घटना कोऱ्हाळे गावाच्या शिवारात घडली.
