महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत दोन पोलीस कॉन्स्टेबल आणि एका खासगी व्यक्तीला १२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
अमोल पाटील आणि जितेंद्र निकुंभे अशी लाच घेणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल्सची नावे आहेत, लाच घेणारे दोन्ही पोलीस कर्मचारी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीला आहेत. त्यांच्यासोबत उमेश बारी नावाच्या एका खासगी व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमळनेर येथील पाचपावली मंदिराजवळ एका टपरीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या सहाय्याने वाहनांमध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय करतात. याच व्यवसायासाठी पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील आणि जितेंद्र निकुंभे यांनी तक्रारदाराकडे दरमहा १५ हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम न दिल्यास त्यांच्यावर बेकायदेशीरपणे गॅस भरल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकीही त्यांनी दिली होती.
या त्रासाला कंटाळून तक्रारदारांनी २३ सप्टेंबर २०२५ रोजी धुळे येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. या सापळ्यामध्ये, पाटील आणि निकुंभे यांनी आरोपी उमेश बारी यांच्यामार्फत १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई अमळनेर येथील बहादरपूर रोडवरील पाचपावली मंदिरासमोरील मीनाबाई ठाकरे शॉपिंग कॉम्प्लेक्समधील स्वराज्य पानाचे दुकानात झाली.
एसीबीच्या या यशस्वी कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर जरब बसण्यास मदत होणार असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांची ‘हप्ता’ वसुली: गॅस भरणाऱ्या व्यावसायिकाकडून लाच घेताना दोन कॉन्स्टेबल व एक साथीदार एसीबीच्या जाळ्यात
अमोल पाटील आणि जितेंद्र निकुंभे अशी लाच घेणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल्सची नावे आहेत



महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –
मिळालेल्या माहितीनुसार,
एसीबीच्या या यशस्वी कारवाईमुळे