संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज
निवडणुकीच्या विजयाचा आनंद साजरा करताना उधळलेला गुलाल आणि कचरा साफ करण्याच्या किरकोळ कारणावरून मंगळवारी (दि. २३ डिसेंबर) संगमनेरच्या इंदिरा नगर भागात मोठा राडा झाला. या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले असून, नवनिर्वाचित नगरसेविका वनिता गाडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एकाच कुटुंबातील चार सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच गाडे कुटुंबीयांवरही गुन्हा दाखल झाला असल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरा नगरमधील गल्ली क्रमांक ४ मध्ये मंगळवारी (२३ डिसेंबर) सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली. निवडणुकीच्या मिरवणुकीनंतर परिसरात पडलेला गुलाल स्वच्छ करण्यासाठी नगर परिषदेची अग्निशामक गाडी बोलावण्यात आली होती. पाण्याचा फवारा मारून स्वच्छता सुरू असताना, स्थानिक तरुण ओम अभंग याच्या अंगावर पाणी उडाले.
या किरकोळ कारणावरून ओमने नगरसेविका वनिता गाडे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद मिटवण्यासाठी नगरसेविकेने ओमच्या आजीला कल्पना दिली. मात्र, काही वेळातच राजू अभंग, यशोदा अभंग आणि अनिकेत अभंग तिथे आले. त्यांनी नगरसेविका, त्यांचे पती आणि मुलीसोबत जोरदार बाचाबाची करत शिवीगाळ केली. या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले.
नगरसेविका वनिता गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी राजू नामदेव अभंग, यशोदा राजू अभंग, अनिकेत राजू अभंग, ओम राजू अभंग या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११५(२), ३५२, ३५१(२), आणि ३२४(२) अंतर्गत गुन्हा (एन सी) दाखल केला आहे.
इंदिरा नगर हा दाट वस्तीचा भाग असल्याने दिवसाढवळ्या झालेल्या या राड्यामुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले होते. धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेप्रकरणी दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल झाले आहेत. सुरुवातीला अभंग कुटुंबाच्या तक्रारीवरून गाडे कुटुंबीयांवर गुन्हा दाखल झाला होता, त्यानंतर आता गाडे यांच्या फिर्यादीवरून अभंग कुटुंबावर कारवाई करण्यात आली आहे.
शहरात सध्या या ‘क्रॉस’ गुन्ह्यांची मोठी चर्चा असून संगमनेर शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.








