

संगमनेर/जळगाव –
महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये सध्या प्रचंड गोंधळाची स्थिती असून भाजपच्या खेळीमुळे राज्याच्या सुसंस्कृत राजकारणाचे मोठे नुकसान होत आहे. गटातटाचे राजकारण राज्यासाठी दुर्दैवी असून सरकारने आता तरी राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे आणि त्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
थोरात सध्या विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांनी अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. शेतकऱ्यांची कर्जमाफी आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या दौऱ्यादरम्यान जळगाव जामोद येथे माजी आमदार कृष्णराव इंगळे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘सातपुडा कृषी प्रदर्शना’चे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी बोलताना त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.
विदर्भातील विविध ठिकाणच्या दौऱ्यात थोरात यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना कृषी प्रदर्शनांच्या महत्त्वावर भर दिला. दहा एकर परिसरात पसरलेल्या या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, फळबाग, वनौषधी आणि शेतीपूरक व्यवसायांची मोलाची माहिती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी कृष्णराव इंगळे यांनी थोरात यांच्या कृषी व शिक्षण मंत्री पदाच्या कार्यकाळातील ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’ आणि ‘एक लाख शेततळे निर्मिती’ सारख्या ऐतिहासिक निर्णयांची आठवण करून दिली. या दौऱ्यात माजी मंत्री यशोमती ठाकूर, सुनील केदार यांच्यासह विदर्भातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. तत्पूर्वी, शेगाव येथे श्री संत गजानन महाराज देवस्थानच्या वतीने बाळासाहेब थोरात यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.





