श्रीरामपूर, विशेष प्रतिनिधी –
कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे डांबून ठेवलेल्या पाच गोवंशीय जनावरांची श्रीरामपूर शहर पोलिसांनी धाडसी कारवाई करत सुटका केली आहे. या कारवाईत सुमारे दोन लाख रुपये किमतीची जनावरे हस्तगत करण्यात आली असून, संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (८ फेब्रुवारी) रात्री १२ वाजेच्या सुमारास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कुरेशी मोहल्ला वॉर्ड नंबर २ मधील एका पडक्या घराच्या आडोशाला काही गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयीपणे बांधून ठेवण्यात आली आहेत. या जनावरांची चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता केवळ कत्तल करण्याच्या हेतूने त्यांना तिथे ठेवण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीची खात्री होताच पोलीस निरीक्षक देशमुख यांनी तपास पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी रात्री १२:३० च्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला असता, तिथे दीड लाख रुपये किमतीच्या ३ जर्शी गायी, २५ हजार रुपये किमतीची एक जर्शी कालवड आणि २५ हजार रुपये किमतीचा एक गावरान गोऱ्हा अशी एकूण २ लाख रुपये किमतीची ५ जनावरे मिळून आली.
याप्रकरणी अधिक चौकशी केली असता, ही जनावरे अजमद अजिज कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, श्रीरामपूर) याने कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपीविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या विविध कलमान्वये गुन्हा (रजि. क्र. ८८/२०२५) दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक भैरवनाथ अडागळे करत आहेत.
कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची पोलिसांकडून सुटका; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.



श्रीरामपूर, विशेष प्रतिनिधी – 


