संगमनेर, प्रतिनिधी –
तालुक्यातील निमगावजाळी येथील माधुरी मनोज अरगडे (वय २८) या विवाहितेने सासरच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून शेततळ्यात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. या धक्कादायक घटनेप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात पती मनोज भास्कर अरगडे आणि सासू मीराबाई भास्कर अरगडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माधुरी यांचा विवाह १० वर्षांपूर्वी झाला होता. सुरुवातीचे काही महिने सुखात गेल्यानंतर, पती आणि सासूने किरकोळ घरगुती कारणावरून त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. या जाचाला कंटाळून त्या काही काळ आपल्या मुलांसह माहेरी (अंभोरे) राहण्यास गेल्या होत्या. मात्र, नातेवाइकांच्या मध्यस्थीनंतर त्या पुन्हा सासरी परतल्या होत्या.
७ फेब्रुवारी रोजी माधुरी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती. शोध सुरू असतानाच, गुरुवारी (१२ फेब्रुवारी) औरंगपूर शिवारातील एका शेततळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर तो नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. मृत विवाहितेचे वडील बाळासाहेब रंगनाथ कोटकर यांच्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास आश्वी पोलीस करत आहेत.




