संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर तालुक्यातील तिगाव येथे भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना समोर आली असून, अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून सुमारे ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी सुरेश विठ्ठल सानप (वय ३४, रा. तिगाव) यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:१५ ते २:३० वाजेच्या दरम्यान सानप कुटुंबीय घराशेजारील शेतात ज्वारी कापणीचे काम करत होते. हीच संधी साधून अज्ञात आरोपीने त्यांच्या बंद घराच्या मुख्य गेटचे कुलूप व कोयंडा कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातील ५ हजार रुपये किमतीची साडेतीन ग्रॅमची सोन्याची नथ आणि ३५ हजार रुपये किमतीचा सुमारे १९ ग्रॅम वजनाचा सोन्याचा साई (मोहनमाळ) हार असा एकूण ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.
या घटनेची माहिती २० फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोलिसांना मिळाली. त्यानंतर तत्काळ पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर. ई. लांघे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
तिगाव येथे भरदिवसा घरफोडी; सोन्याचे दागिने लंपास
या घटनेची माहिती २० फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोलिसांना मिळाली.





