महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
वारकरी संप्रदायाचा विचार हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि मानवतेची शिकवण देणारा आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी कठीण काळातही आपला विचार ठामपणे मांडण्यासाठी धीरोदत्तपणे संकटांना सामोरे जाण्याची शिकवण दिली आहे. विकास लवांडे यांच्यावर झालेला भ्याड हल्ला हा अत्यंत दुर्दैवी असून, पुरोगामी महाराष्ट्रात विचार मांडणाऱ्यांवर होणारे असे हल्ले चिंतेची बाब असल्याची तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
आळंदी येथे संत परंपरेचा समतेचा विचार मांडणारे विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे नावाच्या व्यक्तीने शाईफेक केली. या घटनेचा निषेध करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, लवांडे या हल्ल्याला अत्यंत धैर्याने सामोरे गेले आहेत. महाराष्ट्रात यापूर्वीही प्रवीण गायकवाड आणि हनुमंत पवार यांच्यासारख्या विचारवंतांवर हल्ले झाले आहेत, ही मालिका आता विकास लवांडे यांच्यापर्यंत पोहोचली आहे. लोकशाहीत प्रतिवाद करण्याची पूर्ण संधी असताना, आपले विचार मांडण्याऐवजी अशा प्रकारे हल्ले करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, जो अत्यंत चुकीचा आहे.
या घटनेतील सर्वात खेदजनक बाब म्हणजे, महाराष्ट्राच्या विचारधारेला धक्का लावणाऱ्या अशा प्रवृत्तींना शासन पाठीशी घालत असल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. विचारांची लढाई विचारांनीच लढायला हवी; मात्र तसे न करता हिंसेचा मार्ग अवलंबणाऱ्यांना सरकारकडून मिळणारे संरक्षण हे राज्याच्या परंपरेला घातक आहे.
वारकरी संप्रदायातील सर्व अनुयायांनी या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने आणि जागरूकतेने पाहिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. वैचारिक मतभेद असू शकतात, पण वैचारिक प्रतिवाद करण्याऐवजी प्रत्यक्ष हल्ला करणे ही पद्धत निषेधार्ह असून शासनाने अशा गुंडप्रवृत्तीला खतपाणी घालू नये, अशी टीकाही त्यांनी केली आहे.






