जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर, सत्यशोधक विचार मंचाच्या वतीने रविवारी (५ जुलै) सायंकाळी सहा वाजता एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यापारी असोसिएशन हॉल येथे होणाऱ्या या कार्यक्रमात ‘तापलेल्या पृथ्वीची गोष्ट’ या विषयावर पर्यावरण तज्ज्ञ प्रा. डॉ. गुरुदास नुलकर प्रकाश टाकणार आहेत.
हवामान बदलाचे चटके संपूर्ण जगाला बसत असताना, या संकटाची दाहकता आणि त्यामागील शास्त्रीय कारणे समजून घेणे गरजेचे झाले आहे. याच उद्देशाने आयोजित या व्याख्यानात डॉ. नुलकर हे सामान्य नागरिकांना पर्यावरण संवर्धनात कशी भर घालता येईल, याचे सोप्या भाषेत मार्गदर्शन करतील.
सत्यशोधक विचार मंच आपल्या प्रबोधनपर उपक्रमांसाठी ओळखला जातो. मंचाचे समन्वयक संदीप काकड यांनी आवाहन केले आहे की, पर्यावरण रक्षणाची ही चळवळ पुढे नेण्यासाठी संगमनेरमधील नागरिक, तरुण, विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींनी या व्याख्यानाला बहुसंख्येने उपस्थित राहावे.