Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –

समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा मतदारसंघातील कसारा दुमाला येथील सावंतवस्ती, तळेगाव दिघे येथील धनगरवाडी आणि मिर्झापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम तसेच पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

आमदार अमोल खताळ यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी शाळांच्या भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत वर्गखोल्या अपुऱ्या असल्याने अध्यापनावर परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन संबंधित शाळांमध्ये आवश्यक वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले.

या निधीमुळे कसारा दुमाला, तळेगाव दिघे आणि मिर्झापूर येथील विद्यार्थ्यांना अधिक प्रशस्त, सुरक्षित व शैक्षणिकदृष्ट्या पोषक वातावरण उपलब्ध होणार आहे. नवीन वर्गखोल्यांमुळे नियमित अध्यापनासाठी आवश्यक जागा उपलब्ध होऊन शिक्षकांनाही अध्यापनाचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच उत्तम शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने शाळांच्या इमारती आणि पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष दिले जात आहे. या निर्णयामुळे संबंधित गावांतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply