Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –

राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी जगन्नाथ पुरीचा रथ आणि कृषी संस्कृतीचा मिलाप साधणाऱ्या देखण्या आरासीत गणरायाची स्थापना झाली. तसेच आमदार सत्यजित तांबे यांच्या ‘प्रभा’ निवासस्थानीही गणेशमूर्तीची अत्यंत उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. याशिवाय सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर अमृत सांस्कृतिक मंडळ आणि यशोधन जनसंपर्क कार्यालयातही श्रींची स्थापना करण्यात आली. 

याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई थोरात, डॉ. जयश्रीताई थोरात, आर्किटेक्ट राजवर्धन थोरात, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, टाटा कॅन्सर विभागाचे प्रमुख डॉ. प्रा. हसमुख जैन, डॉ. हर्षल तांबे, डॉ. वर्षा तांबे, अमृतवाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांच्यासह तालुक्यातील विविध पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूजन व आरती करून या उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला.

गणेशोत्सव हे आनंदाचे पर्व असून सर्वांनी हा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले. ध्वनी व वायू प्रदूषण टाळून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्याचे त्यांनी नमूद केले. आमदार सत्यजित तांबे यांनी डीजेच्या कर्कश आवाजामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, महिला व वृद्धांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधले. वैयक्तिकरित्या डीजेला विरोध दर्शवत त्यांनी सार्वजनिक मंडळांनी कमी आवाजात, सांस्कृतिक व शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करून हा आनंददायी उत्सव साजरा करावा, असे आवाहन केले.

‘सुदर्शन’ येथील आरासीबद्दल माहिती देताना राजवर्धन थोरात यांनी सांगितले की, भारतीय संस्कृती आणि परंपरा अतिशय उज्ज्वल आहे. आपण कृषी संस्कृती जपणारे असल्याने यंदा जगन्नाथ पुरी येथील रथाची प्रतिकृती आणि कृषी संस्कृतीचा सुरेख मिलाप साधणारी आरास तयार करण्यात आली आहे. या समृद्ध संस्कृतीचे जतन करत सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण करावे, असा संदेश त्यांनी दिला.

डॉ. जयश्रीताई थोरात यांनी नेपाळमधील नैसर्गिक दुर्घटना आणि दुष्काळासारख्या संकटांचा उल्लेख करत माती, पाणी व हवेचे रक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. पृथ्वीवरील सर्व विघ्ने दूर करून मानवता आणि सजीव सृष्टीचे रक्षण कर, अशी प्रार्थना त्यांनी श्रींच्या चरणी केली.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी गणेशोत्सव हा समाजात एकता व समता निर्माण करणारा काळ असल्याचे सांगितले, तर नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांनी या उत्सवानिमित्त सर्वांच्या जीवनात आनंद व समृद्धी येवो, अशा शुभेच्छा दिल्या.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply