Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघ आज तब्बल चार लाख लिटरपर्यंत दूध संकलन करत आहे. प्रत्येक टप्प्यावर दूध संघाने यशस्वी वाटचाल केली असून, मुक्त संचार गोठा आणि मुरघास ही या संघाने संपूर्ण राज्याला दिलेली मोठी देण आहे. संगमनेर तालुका दूध संघाचे भक्कम संरक्षण पाठीशी असल्यामुळेच आज खाजगी व्यावसायिक शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव देत आहेत. निर्भेळ आणि गुणवत्तेचे दूध हेच वैशिष्ट्य असल्याने राजहंस हा गुणवत्तेचा व विश्वासाचा अस्सल ब्रँड बनला आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.

संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख हे होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, पांडुरंग घुले, डॉ. जयश्रीताई थोरात, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर यांच्यासह विविध मान्यवर आणि संचालक उपस्थित होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, ४९ वर्षांची दुध संघाची वाटचाल ही अत्यंत यशस्वी राहिली आहे. गुणवत्तेच्या जोरावरच आज गुलबर्गा ते सुरत, चंद्रपूर, अमरावती आणि नागपूर यांसारख्या विविध शहरांमध्ये राजहंस दुधाला मोठी मागणी आहे. या संघामुळे गरीब शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि आनंद निर्माण झाला असून आगामी काळात संघाने बेकरी उत्पादनांच्या निर्मितीवर आणि गुणवत्ता वाढीवर अधिक भर द्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.

यावेळी तालुक्यातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी वीज आणि पाण्याच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली. निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले असताना सध्या तालुक्यात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. वीज बंद करून पाणी पुढे नेण्याचे प्रकार होत असून, काही लोकांना तालुक्याची घडी मोडायची आहे. त्यामुळे नागरिकांनी जागृत राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. तालुक्यात वाढलेली गुंडगिरी, फ्लेक्सबाजी आणि सहकार उध्वस्त करण्याची भाषा अत्यंत दुर्दैवी असून राज्यातील दुष्काळी परिस्थितीकडे सरकारचे लक्ष नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी संघाच्या आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा मांडला. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाने सुमारे ६०८ कोटी रुपयांची उलाढाल केली असून, यातील तब्बल ५०० कोटी रुपये थेट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खिशात गेले आहेत. मागील वर्षी सरासरी ३८ रुपये दर दिला गेला होता, तर सध्या ४१ रुपये प्रति लिटर असा उच्चांकी दर दिला जात आहे. दूध संघाने टाटा कंपनीचा सोलर प्रकल्प बसवला असून त्यातून दरमहा १५ ते २० लाख रुपयांची वीज निर्मिती होणार आहे. संघाच्या वतीने आगामी काळात उपपदार्थ निर्मिती वाढवण्यासोबतच ‘मिशन ५० लिटर’ हे ध्येय प्रत्येक घरापर्यंत पोहोचवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी देशातील दूध क्रांतीत डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या योगदानाचे स्मरण करून शेतकऱ्यांनी सहकारावर निष्ठा ठेवावी असे सांगितले. तर डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दूध व्यवसायातील महिलांच्या योगदानाचा गौरव करत, सहकार टिकवण्याचे आवाहन केले.

या वार्षिक सर्वसाधारण सभेत वर्षभरात सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था आणि वैयक्तिक दूध उत्पादकांचा सन्मानचिन्ह व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. सभेचे स्वागत व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर यांनी केले. नोटीस वाचन कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी केले, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर आभार विक्रमराजे थोरात यांनी मानले. या सभेला तालुक्यातील शेतकरी, दूध उत्पादक सभासद आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या भूमिकेला पाठिंबा: रणजीतसिंह देशमुख

दुग्धविकास क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंडे यांनी घेतलेली भूमिका अत्यंत कौतुकास्पद आहे, त्यांच्या कडक कारवाईमुळे बनावट दूध आणि भेसळयुक्त पनीरची विक्री मोठ्या प्रमाणात रोखली गेली असून सुमारे २० ते २५ टक्के बनावट दूध कमी झाले आहे. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळेच ‘राजहंस’सारख्या गुणवत्ता जपणाऱ्या संघांची विक्री वाढली आहे. त्यामुळे तुकाराम मुंडे यांनी शासकीय स्तरावर कायम हा विभाग सांभाळावा, अशी मागणी करत रणजीतसिंह देशमुख यांनी त्यांच्या भूमिकेला पूर्ण पाठिंबा दर्शवला. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित सर्व सभासदांनी टाळ्यांच्या कडकडाटात या भूमिकेचे स्वागत केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply