महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शेतकी सहकारी संघ ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. तिची काळजीपूर्वक जपणूक करताना काळाची गरज ओळखून धाडसी, दूरदृष्टीचे आणि शेतकरीहिताचे निर्णय घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर शेतकी सहकारी संघाच्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या ६७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे उपस्थित होते.
थोरात म्हणाले, शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि त्यांच्या शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून अनेक संस्था उभ्या राहिल्या. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून बाजार समित्यांची संकल्पना पुढे आली. याच काळात तीर्थरूप भाऊसाहेब थोरात (दादा) यांनी १९५९ साली संगमनेर शेतकी सहकारी संघाची स्थापना केली.
शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेणारी संस्था म्हणून ६७ वर्षांच्या वाटचालीत नियोजनबद्ध कारभार, काटकसर आणि पारदर्शकतेच्या माध्यमातून या संघाने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. संस्थेच्या जडणघडणीत अनेक आजी-माजी संचालकांचे मोलाचे योगदान राहिले आहे. एक-एक रुपयाची काळजी घेणे, काळानुरूप बदल स्वीकारणे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक ते निर्णय घेणे हे या संस्थेचे वैशिष्ट्य राहिले असून आज या संघाचे दोन पेट्रोल पंपही यशस्वीपणे कार्यरत आहेत.
अनेक अडचणींवर मात करत ही संस्था आजही भक्कमपणे उभी असल्याचे सांगत बाळासाहेब थोरात यांनी संस्थेच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्व आजी-माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, सभासद बांधव तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून आभार मानले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संपतराव डोंगरे, उपाध्यक्ष सुनील कडलग, व्यवस्थापक अनिल थोरात यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.