Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन:

‘आपली संस्कृती, आपला अभिमान’ या विचाराला कृतीची जोड देत आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून संगमनेरमध्ये आयोजित करण्यात आलेला ‘महावादन सोहळा’ बुधवारी अत्यंत जल्लोषात पार पडला.

परंपरेचा आणि संस्कृतीचा समृद्ध ठेवा जपणारा हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो संगमनेरकरांनी गर्दी केली होती. पाच प्रसिद्ध ढोल-ताशा पथकांच्या दमदार सादरीकरणाने संपूर्ण संगमनेर शहर मंत्रमुग्ध होऊन गेले.

महावादन सोहळ्याचे हे दुसरे वर्ष होते. या सांस्कृतिक सोहळ्यात तांडव, हिंदूराजा, रुद्र प्रतिष्ठान, छावा आणि एकलव्य गर्जना या पाच ढोल-ताशा पथकांनी आपल्या उत्कृष्ट वादनाचे प्रात्यक्षिक सादर केले. पथकांच्या पारंपरिक कौशल्यामुळे, शिस्तीमुळे आणि जोशपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह आणि चैतन्य निर्माण झाले. ढोल-ताशांच्या कडकडाटात आणि गजरत तरुणाईसह सर्व वयोगटातील नागरिकांनी या अभूतपूर्व सोहळ्याचा मनसोक्त आनंद लुटला.

आपल्या समृद्ध संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, तसेच या क्षेत्रातील स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने आमदार सत्यजीत तांबे यांनी या उपक्रमाची सुरुवात केली आहे. नव्या पिढीला आपल्या मातीशी आणि परंपरेशी जोडणारे एक प्रभावी व्यासपीठ म्हणून महावादन सोहळ्याची ओळख निर्माण होत आहे.

सलग दुसऱ्या वर्षीही या उपक्रमाला संगमनेरकरांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा या सोहळ्याशी लोकांचे निर्माण झालेले आपुलकीचे नाते स्पष्ट करतो. आपल्या परंपरा आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी अधोरेखित करणारा हा सोहळा ठरला असून, अशा प्रकारचे संस्कृती जपणारे उपक्रम शहरात सातत्याने आयोजित केले जावेत, अशी भावना संगमनेरकरांनी यावेळी व्यक्त केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply