वैद्यकीय क्षेत्र हे केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. डॉक्टरांनी आपल्या ज्ञान, कौशल्य आणि अनुभवाचा उपयोग समाजातील गरजू, वंचित व दुर्गम भागातील नागरिकांच्या सेवेसाठी करून सेवा भाव सातत्याने जपला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब विखे पाटील ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सतिष महाजन यांनी केले.
अकोले तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘आत्मा गणेश उत्सव २०२६’ अंतर्गत “डॉक्टर आणि समाजकारणातील संधी” या विषयावर विशेष परिसंवाद पार पडला.
या परिसंवादात बोलताना डॉ. महाजन यांनी स्पष्ट केले की, डॉक्टर हा समाजातील अत्यंत विश्वासार्ह घटक आहे. रुग्णांवर उपचार करण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार देणे, आरोग्यविषयक जनजागृती करणे आणि समाजातील गरजू घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे ही डॉक्टरांची प्रमुख सामाजिक जबाबदारी आहे. विशेषतः आदिवासी व दुर्गम भागात आजही दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध होत नसल्याने तेथे तज्ज्ञ डॉक्टरांनी पुढाकार घेऊन विविध सेवा उपक्रम राबवणे काळाची गरज आहे.
या प्रसंगी डॉ. बाळासाहेब विखे पाटील ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश जगदाळे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, वैद्यकीय ज्ञानाला जेव्हा सेवाभावाची जोड मिळते, तेव्हा उपचार केवळ आजारापुरते मर्यादित न राहता समाजाच्या आरोग्याचा पाया मजबूत करण्याचे कार्य घडते. या परिसंवादातून डॉक्टरांनी व्यावसायिक जबाबदारीसोबत सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य शिबिरे, जनजागृती उपक्रम आणि गरजू रुग्णांसाठीच्या सेवाकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, यावर सखोल विचारमंथन करण्यात आले.
या कार्यक्रमाला रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी विकास घुले, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भाटे यांच्यासह अकोले तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप कडलग, सचिव डॉ. प्रतीक घोडके, खजिनदार डॉ. निलेश सहाने, डॉ. नितीन चासकर, डॉ. रविंद्र डावरे, अकोले हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रकाश वाकचौरे, गावडे हॉस्पिटलचे संचालक डॉ. तुषार गावडे, डॉ. सुभाष सोमण, डॉ. मंजुश्री रहाणे व डॉ. उमा कुलकर्णी हे मान्यवर आणि मोठ्या संख्येने वैद्यकीय व्यावसायिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सतीश वाळूंज यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. रवींद्र डावरे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी डॉ. सागर कोल्हाळ, डॉ. संतोष तिकांडे, डॉ. सतीष चासकर, डॉ. तेजस शहा, डॉ. अद्वैत देशपांडे आणि डॉ. संतोष देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.