Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

भारतीय संविधानाने दिलेल्या धर्मस्वातंत्र्य, समानता आणि न्यायाच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासोबतच ख्रिस्ती समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी (१९ सप्टेंबर) दुपारी २ वाजता हरेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषदेचे’ आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती पक्षाच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी दिली.

या परिषदेमध्ये ख्रिस्ती समाजावर आणि प्रार्थना स्थळांवर येणारे निर्बंध, चर्चना बजावण्यात आलेल्या नोटिसा, अल्पसंख्याक समाजावरील अन्याय-अत्याचार आणि धार्मिक संस्था चालविण्याच्या संविधानिक हक्कांवर सविस्तर मंथन केले जाणार आहे. संविधानाने नागरिकांना दिलेले धर्म, श्रद्धा आणि उपासनेचे अधिकार अबाधित राखण्यासाठी, तसेच अन्यायाविरोधात लोकशाही आणि संविधानिक मार्गाने संघर्ष उभारण्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी ही परिषद अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

या कार्यक्रमास प्रा. किसन चव्हाण, दिशा पिंकी शेख, उत्कर्षा रूपवते, अरुण जाधव, संतोष चोळके, मधुकर साळवे आणि सुनील ब्राह्मणे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. परिषदेच्या यशस्वीतेसाठी पाद्री, चर्च प्रतिनिधी, धार्मिक संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला आणि सकल ख्रिस्ती समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून या हक्कांच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष डॉ. गौतम चित्ते आणि महासचिव ॲड. अण्णासाहेब मोहन यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply