अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा आणि छुप्या मार्गाने होणाऱ्या वाळू वाहतुकीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) कारवाईचा बडगा उचलला आहे. राहाता आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापे टाकून वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण ३० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ३ आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे, तर कारवाईदरम्यान २ आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले आहेत.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर, विशेषतः वाळू माफिया आणि अवैध वाळू वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदार सुनील पवार, अरुण गांगुर्डे, अभिजित अरकल, रणजित जाधव, अजिनाथ पाखरे आणि सतीश भवर यांचे विशेष पथक तयार करून त्यांना कारवाईसाठी रवाना केले होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकाने १७ व १८ सप्टेंबर रोजी राहाता व कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग दोन ठिकाणी मिळालेल्या माहितीच्या आधारे छापे टाकले.
पहिली कारवाई – राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत पथकाने १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी विशाल संजय जोगदंड (वय ३५, रा. पुणतांबा बाजारतळ, शिर्डी) व रामनाथ हरीभाऊ शिंदे (वय ३०, रा. लुटे वस्ती, पिंपळवाडी रोड, शिर्डी) या दोन आरोपींना पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले. तर त्यांचा साथीदार स्वप्नील गोंदकर (पूर्ण नाव माहीत नाही, रा. शिर्डी) हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ३८५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत – कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकलेल्या छाप्यात पथकाने १५ लाख २० हजार रुपयांचा वाळू वाहतुकीशी संबंधित मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी आकाश दशरथ पगारे (वय २३, रा. कोपरगाव खडकी, ता. कोपरगाव) याला ताब्यात घेण्यात आले, तर विशाल लोंढे (पूर्ण नाव माहीत नाही, रा. सिन्नर, जि. नाशिक) हा फरार झाला आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४२४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.