तालुक्याचा विकास हा कष्टातून उभा राहिला असून केवळ मोबाईलवर अफवा आणि गैरसमज पसरवणाऱ्या निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये, असा घणाघाती हल्ला राज्याचे माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर केला.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव पाटील खेमनर, माधवराव कानवडे, व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, दुर्गाताई तांबे, रणजीत सिंह देशमुख, शंकरराव खेमनर, सुधाकर जोशी, डॉ. जयश्रीताई थोरात, बुवाजी बाबा पुणेकर, शरद नाना थोरात, मधुकरराव नवले, लहानभाऊ गुंजाळ, आर. बी. राहणे, रामदास वाघ, गणपतराव सांगळे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ज्यांनी आयुष्यात कधी उसाचे टिपरू पिकवले नाही, १ लिटर दूध उत्पादित केले नाही किंवा कोणाला मदत केली नाही, ते लोक आज कोणाच्यातरी सांगण्यावरून आणि दाणापाणी बंद होण्याच्या भीतीपोटी टीका करत आहेत. उठसूट पत्रकार परिषदा घेणारे लोकप्रतिनिधी वीज, पाणी आणि रेल्वे या तालुक्याच्या मुख्य प्रश्नांवर बोलत नाहीत; त्यांचे लक्ष केवळ मुरूम आणि वाळूपर्यंतच मर्यादित आहे. शेतकऱ्यांनी कष्टातून उभ्या केलेल्या सोन्यासारख्या सहकारी संस्था उद्ध्वस्त करण्याची भाषा हे लोक करत आहेत, परंतु ही तालुक्याची संस्कृती नाही. अशा रोखठोक भाषेत थोरात यांनी विरोधकांना सुनावले.
निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले, मात्र आता कालव्यांचे काँक्रिटीकरण करून पाणी पुढे नेले जात आहे. आधी सलग ११ तास पूर्ण दाबाने वीज मिळायची, आता विजेचा खेळखंडोबा झाला आहे. वीज बंद केली की पाणी पुढे जाते. त्यामुळे हक्काचे पाणी आणि सुरळीत विजेसाठी तालुक्याला पुन्हा संघर्षासाठी तयार राहावे लागेल. तसेच, यावर्षी साखर कारखाना आणि दूध संघ सर्वांची दिवाळी गोड करणार असल्याची खूशखबर त्यांनी दिली.
कारखान्याच्या वाटचालीविषयी सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, ८०० मेट्रिक टनावरून सुरू झालेल्या या कारखान्याने विस्तारीकरणासह डिस्टलेरी, इथेनॉल आणि वीज निर्मिती क्षेत्रात ५९ वर्षांत यशस्वी वाटचाल केली आहे. भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्शांनुसार काटकसर आणि पारदर्शकता ही या कारखान्याची वैशिष्ट्ये राहिली आहेत. निळवंडेचे पाणी आल्याने उसाचे क्षेत्र वाढवून शेतकऱ्यांनी एकरी १०० टन उत्पादन घेण्याचे लक्ष्य ठेवावे. कार्यक्षेत्रात ११ लाख टन ऊस निर्माण झाल्यास राज्यात सर्वाधिक भाव देण्याची परंपरा कायम राखली जाईल.
याशिवाय, साखर उद्योगातून केंद्र व राज्य सरकारला वर्षाला सुमारे ८ हजार कोटी रुपये मिळतात. दहा वर्षांतून एकदा येणाऱ्या अडचणीच्या काळात सरकारने साखर कारखानदारीला मदत केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले.
सभेच्या सुरुवातीला नोटीस वाचन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आणि सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वाधिक एकरी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सपत्नीक सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे संचालक संतोष हासे, इंद्रजीत थोरात, इंद्रजीत खेमनर, संपतराव गोडगे, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे, सतीश वर्पे, रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे, विजय राहणे, गुलाब देशमुख, अरुण वाकचौरे, योगेश भालेराव, अंकुश ताजने, दिलीप नागरे, सौ. लताताई गायकर, सौ. सुंदराबाई दुबे, बंडू नाना भाबड, मदन आंबरे उपस्थित होते.