महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –
संगमनेर शहरातील बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेल्या एमडी ड्रग प्रकरणाला आता नाट्यमय वळण मिळाले आहे. संगमनेर शहर पोलिसांच्या एकूणच संशयास्पद आणि धक्कादायक कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर, या संपूर्ण प्रकरणाचा तपास अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे (LCB) वर्ग करण्यात आला आहे. 
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी संगमनेर दौऱ्यावर असताना काल हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. वरिष्ठांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला असला, तरी एका निष्पाप तरुणाला बनावट गुन्ह्यात अडकविणाऱ्या त्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्याला अद्यापही ‘अभय’ का दिले जात आहे, असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक आणि विविध स्तरातून विचारला जात आहे.
मागील आठवड्यात संगमनेर पोलिसांनी एमडी ड्रग जप्तीची मोठी कारवाई केल्याचा डांगोरा पिटला होता. या कारवाईत काशिद असद कुरेशी (रा. संगमनेर) या तरुणाला अटक करण्यात आली होती. परंतु, या कारवाईनंतर जे सीसीटीव्ही फुटेज समोर आले, त्याने संपूर्ण पोलिसांच्या खाकी वर्दीवरच डाग लावला आहे. पोलिसांनी पकडलेल्या आरोपीच्या वाहनात ड्रग ठेवून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचे या फुटेजमधून स्पष्टपणे समोर आले.
यामुळे पोलीस दलातील ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याचाच अक्षरशः खेळखंडोबा झाल्याचे पाहायला मिळत आहे. पोलीस अधिकारीच जेव्हा गुन्हेगारांसारखे षड्यंत्र रचून निष्पाप नागरिकांना जाळ्यात ओढतात, तेव्हा जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा, असा जळजळीत प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दरम्यान, या खोट्या आणि बनावट कारवाईचा तीव्र निषेध करत संगमनेरच्या अल्पसंख्याक समाजातील काही मान्यवरांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याचा इशारा दिला आहे. संबंधित दोषी पोलीस अधिकाऱ्यावर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा विरोध तीव्र होत असतानाच, दुसरीकडे ज्या ठिकाणी पोलिसांनी ही बनावट कारवाई केली, त्या संगमनेर बसस्थानक परिसरातील दोन हॉटेल आणि एका दुकानातील मुख्य सीसीटीव्ही फुटेज अचानक गायब झाल्याची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे फुटेज नक्की कुणी गायब केले, कुणाच्या दबावाखाली डिलीट केले गेले की डिलीट करायला भाग पाडले, याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. पुरावे नष्ट करून आरोपी अधिकाऱ्याला वाचवण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात असून यामुळे या प्रकरणात नवा ‘ट्विस्ट’ निर्माण झाला आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी संगमनेरला भेट देऊन सुरुवातीला या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्याकडे सोपवला होता. परंतु, प्रकरणाचे गांभीर्य आणि वाढता जनक्षोभ लक्षात घेता काही तासांतच निर्णय बदलून तपास थेट स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास काढून घेतला असला तरी, ज्या पोलीस अधिकाऱ्याने हा सगळा कट रचला त्यावर अद्याप कोणतीही थेट धडक कारवाई झालेली नाही.
आता गुन्हे शाखा या प्रकरणातील दोषी पोलीस अधिकाऱ्याचा बुरखा टरकावून त्याच्यावर कारवाईचे धाडस दाखवणार की केवळ तपासाचे गुऱ्हाळ सुरू ठेवून आपल्या सहकारी अधिकाऱ्याला वाचविले जाणार, याकडे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply