महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –

संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेला विजेचा खेळखंडोबा, ऐनवेळी होणारे शटडाऊन आणि त्रासदायक भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या हक्कासाठी संगमनेर तालुका काँग्रेस आक्रमक झाली आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात येत आहे. या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी गावोगावी धाव घेत जोरदार जनसंपर्क अभियान सुरू केले आहे.

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे तसेच युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस अध्यक्ष अजय फटांगरे, शहर काँग्रेस अध्यक्ष सोमेश्वर दिवटे आणि कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चाच्या नियोजनात पूर्ण ताकदीने सक्रिय झाले आहेत. काँग्रेसचे हे सर्व पदाधिकारी गावोगावी जाऊन शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत.

तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. याशिवाय वारंवार वीज जात असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे आणि शैक्षणिक सत्राचे प्रचंड नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील लघुउद्योजक, व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून दैनंदिन जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. वीज हा प्रत्येकाच्या जगण्याशी जोडलेला अत्यंत मूलभूत प्रश्न असल्याने आता गप्प न बसता आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचे नेत्यांचे म्हणणे आहे.

हा लढा केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित नसून संपूर्ण ग्रामीण भागाच्या अस्तित्वाचा आणि मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे पक्षाचे भेद बाजूला ठेवून तालुक्यातील शेतकरी, विद्यार्थी, व्यावसायिक व सर्वसामान्य नागरिकांनी या जनआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आग्रही आवाहन काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply