महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –

सोशल मीडिया हे आजच्या माहितीच्या युगात अत्यंत प्रभावी माध्यम बनले आहे. मात्र, काही अपरिपक्व आणि दिशाभूल करणारे सल्लागार चुकीच्या माहितीचा प्रसार करत असून, अशा प्रकारे अफवा व गैरसमज पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करून त्यांचा योग्य तो बंदोबस्त केला पाहिजे, असा रोखठोक इशारा देत विकासकामे करण्याऐवजी केवळ फ्लेक्सचे राजकारण केले जात आहे. संगमनेर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी, विजेसाठी आणि आर्थिक समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन संघर्ष करावा लागणार असल्याचे राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

सहकार महर्षी अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी होते. या प्रसंगी व्यासपीठावर पद्मश्री रघुवीर खेडकर, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, बाबा ओहोळ, इंद्रजीत थोरात, शंकरराव खेमनर, व्हाईस चेअरमन ॲड. नानासाहेब शिंदे, संचालक किसन सुपेकर, ॲड. लक्ष्मण खेमनर, शिवाजी जगताप, बापूसाहेब गिरी, अविनाश सोनवणे, बाबुराव गुंजाळ, किसन वाळके, शांताराम फड, अण्णासाहेब शिंदे, सौ. कमलताई मंडलिक, श्रीमती ललिता दिघे, विवेक तांबे, राजू गुंजाळ, भाऊसाहेब गीते, गोरख कुटे, मोहन करंजकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वार्षिक सभेत बँकेचे सभासद आणि महाराष्ट्राचे प्रसिद्ध लोककलाकार रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारतर्फे ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाल्याबद्दल मानपत्र देऊन विशेष गौरवण्यात आले. यासोबतच बँकेच्या उत्कृष्ट ग्राहकांचाही सन्मान करण्यात आला.

या वेळी बोलताना पद्मश्री रघुवीर खेडकर भावूक झाले. कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात अमृतवाहिनी बँकेने आणि लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्याला मोठी मदत केली, अशी आठवण त्यांनी सांगितली. मला मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा संपूर्ण संगमनेर तालुक्याचा सन्मान आहे. तत्त्व आणि सत्व जपणारे लोकनेते म्हणजेच बाळासाहेब थोरात आहेत, असे उद्गार त्यांनी काढताच संपूर्ण सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यातील सर्व सहकारी संस्था अत्यंत कष्टातून उभ्या राहिल्या असून त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. तालुक्यातील बँका आणि पतसंस्थांमध्ये मिळून सुमारे ९००० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. ही तालुक्याची खरी आर्थिक समृद्धी आणि विश्वासाचे प्रतीक आहे. दुर्दैवाने, हे समृद्ध सहकाराचे जाळे मोडण्यासाठी काही लोक सातत्याने प्रयत्न करत आहेत.

सध्या राज्यात दुष्काळी परिस्थिती असून पिके जळून चालली आहेत. अशा वेळी शेतीला पाण्याची नितांत गरज असताना विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. संगमनेरच्या हक्काचे पाणी डोळ्यादेखत पुढे निघून जात आहे. शेती आणि शेतकरी जगला तरच अर्थव्यवस्था टिकेल, म्हणूनच दुष्काळ तातडीने जाहीर करून शेतकऱ्यांना थेट मदत देण्याची गरज असल्याचे म्हटले.

सुधाकर जोशी म्हणाले, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या खंबीर नेतृत्वाखाली अमृतवाहिनी बँकेची एकूण उलाढाल १२०० कोटी रुपयांवर पोहोचली असून एनपीए (NPA) शून्य टक्के राखण्यात यश आले आहे. बँक अत्यंत सुरक्षित व कमी जोखीम असलेली संस्था म्हणून ओळखली जाते. काही समाजकंटक सोशल मीडियाच्या माध्यमातून बँकेबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. याच सभेत बँकेतर्फे व्हॉट्सॲप बँकिंग व डिजिटल बँकिंग सुविधांचे उद्घाटन करण्यात आले, तसेच सभासदांना ९ टक्के लाभांश (डिव्हिडंड) त्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे वितरित करण्यात आला.

सभेचे प्रास्ताविक चेअरमन सुधाकर जोशी यांनी केले, नोटीस वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील जोशी यांनी केले आणि आभार व्हाईस चेअरमन नानासाहेब शिंदे यांनी मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply