महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-

ज्या तालुक्याने अत्यंत कष्टातून, घामाच्या धारा गाळून आपले वैभव उभे केले, त्या समृद्ध संगमनेरला उद्ध्वस्त करण्याचा कुटिल डाव रचला जात आहे. हक्काचे पाणी रोखण्यासाठी आणि पुढे पळवण्यासाठी विजेचा खेळखंडोबा सुरू करण्यात आला असून, या सुलतानी कारभाराविरोधात संपूर्ण संगमनेर तालुका आता रस्त्यावर उतरणार आहे. 

हक्काचे पाणी आणि पूर्ण दाबाने वीज मिळावी या मागणीसाठी मंगळवारी (२२ सप्टेंबर) सकाळी ९ वाजता यशोधन कार्यालयाच्या प्रांगणातून प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ धडकणार आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या खंबीर उपस्थितीत हा ऐतिहासिक मोर्चा निघणार असल्याची माहिती संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडगाव पान येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सत्ताधाऱ्यांच्या गलथान कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या दूरदृष्टीने आणि संघर्षातून भंडारदरा धरणातून तालुक्यासाठी ३० टक्के हक्काचे पाणी मिळवून दिले. दुष्काळी भागाचा कलंक पुसण्यासाठी निळवंडे धरण आणि दोन्ही कालव्यांची कामे पूर्णत्वास नेली. आज कालव्यांमध्ये पाणी खेळत आहे, पण हेच हक्काचे पाणी संगमनेरकरांना मिळू नये म्हणून ऐन गरजेच्या वेळी विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. पाणी पुढे पळवून तालुका उद्ध्वस्त करण्याचा हा डाव असून तो संगमनेरची जनता कधीही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

तालुक्यात सध्या रात्रीच्या वेळी ऐन महत्त्वाच्या काळात ६ ते ९ या वेळेत थेट लोडशेडिंग लादले जात आहे. या अन्यायाविरोधात वारंवार प्रशासनाला निवेदने दिली, वेशीवर टांगून जाब विचारला, तरीही बधिर झालेल्या प्रशासनाला जाग आलेली नाही. आम्हाला कोणाची भीक नको, तर आमच्या हक्काची ११ तास पूर्ण दाबाने मिळणारी वीज आणि हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, हीच संगमनेरच्या प्रत्येक शेतकरी आणि नागरिकांची ठाम मागणी आहे. याच अन्यायाचा कडेलोट झाल्याने आता आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलनाच्या माध्यमातून दीर्घ काळानंतर काँग्रेस पुन्हा रस्त्यावर दिसणार आहे.

मंगळवारी निघणाऱ्या या महामोर्चामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, शेतकरी आणि महिला हजारोच्या संख्येने सामील होणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआय, पुरोगामी व समविचारी पक्ष, विविध सामाजिक व विद्यार्थी संघटना, संगमनेर तालुका कृती समिती, स्वाभिमानी संगमनेर तालुका संघटना यांनी या मोर्चाला पूर्ण ताकद दिली आहे.

आपल्या हक्काच्या पाण्यासाठी आणि सुरळीत विजेसाठी तालुक्यातील सर्व नागरिक, शेतकरी आणि महिलांनी मोठ्या संख्येने या जनआक्रोश मोर्च्यात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. जयश्रीताई थोरात यांच्यासह सर्वपक्षीय कृती समितीने केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply