Showing 1 of 1
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
सलग अठरा वर्षांची यशस्वी परंपरा लाभलेला ‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरच्या कला आणि सांस्कृतिक क्षेत्राचा खरा मानबिंदू ठरला आहे. हा महोत्सव दरवर्षी यशाची नवी शिखरे सर करत आहे, त्याचे मूळ कारण संगमनेरकर कलारसिकांचा भक्कम पाठिंबा आणि मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हेच आहे. रसिकांच्या या प्रेमामुळे आमचा उत्साह कैक पटीने वाढला असून पुढील वर्षी आणखी दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी नवे बळ मिळाले आहे, असे प्रतिपादन राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष आणि फेस्टिव्हलचे प्रमुख मनीष मालपाणी यांनी केले.
गणेशोत्सवानिमित्त राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी उद्योग समूहाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सहा दिवसीय संगमनेर फेस्टिव्हलचा सोमवारी ‘नाना थोडं थांबा ना’ या विनोदी नाटकाने शानदार समारोप झाला.
१६ ते २१ सप्टेंबर दरम्यान चाललेल्या या महोत्सवाच्या सांगता प्रसंगी सुमारे साडेतीन हजार प्रेक्षकांच्या तुडुंब उपस्थितीत नाटकाच्या मध्यंतरात आयोजित सत्कार सोहळ्यात मनीष मालपाणी बोलत होते.
मालपाणी म्हणाले की, संगमनेर फेस्टिव्हलचे यशस्वी आयोजन करणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखे मोठे आव्हान असते. मात्र, मंडळाचे सर्व उत्साही पदाधिकारी आणि कार्यकर्ते गेल्या महिनाभरापासून यासाठी अहोरात्र परिश्रम घेतात. या आयोजनासाठी मोठा खर्च येत असला, तरी अनेक दानशूर व्यक्ती उत्स्फूर्तपणे मदतीचा हात पुढे करतात. त्यामुळेच देशभरातील नावाजलेले आणि अभिरुचीसंपन्न सांस्कृतिक कार्यक्रम संगमनेरकरांच्या सेवेत मोफत सादर करणे शक्य होते. लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेल्या गणेशोत्सवाचे मूळ स्वरूप जपताना मनोरंजन, ज्ञान, संस्कार आणि समाजप्रबोधन यांचा मेळ घालण्यावर मंडळाने सुरुवातीपासून भर दिला आहे.
आजच्या सांगता सोहळ्यात ‘नाना थोडं थांबा ना’ या अस्सल ग्रामीण बाजाच्या विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवून लोटपोट केले. याप्रसंगी नाटकात उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या कलाकारांचा आणि आयोजनात विशेष योगदान देणाऱ्या मनोज साकी, मुरारी देशपांडे, सचिन गाडे, भारत मोरे, विनायक भोईर व यश भंगीरे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा असावा यांनी केले. या सोहळ्यास मालपाणी फार्मच्या संचालिका तथा नगरसेविक रचना मालपाणी, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी, सुनीता मालपाणी, मंडळाचे कार्याध्यक्ष सागर मणियार, उपाध्यक्ष कल्पेश मर्दा, सचिव कृष्णा असावा आणि खजिनदार वेणुगोपाल कलंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘एक पेन, एक वही’ उपक्रमातून सामाजिक भान-
मालपाणी परिवाराच्या वतीने ११ लाख रुपयांच्या योगदानातून साकारलेली ‘संगमनेरच्या राजाची’ अत्यंत देखणी मूर्ती चावडी येथील राजस्थान युवक मंडळाच्या मंडपात विराजमान झाली आहे. या बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी श्रीफळ, फुले किंवा हार आणण्याऐवजी ‘एक पेन आणि एक वही’ अर्पण करावी, असे आवाहन मनीष मालपाणी यांनी केले. या उपक्रमातून जमा होणारे हे शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार असून, ‘एक पेन, एक वही, विद्यार्थ्यांसाठी हेच सही’ या भावनेतून प्रत्येकाने या उपक्रमात सहभागी होऊन संगमनेरचे सामाजिक भान आणि वेगळेपण जपावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.




Post Views: 79
Showing 1 of 1

