What's Hot

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) जिल्ह्यात व्यापक मोहीम उघडली असून संगमनेर तालुक्यातील एका खाद्य आस्थापनेवर अचानक छापा टाकून २ लाख ६० हजार ८२० रुपये किंमतीचा संशयास्पद ‘काऊ घी’चा साठा जप्त केला आहे.
याचबरोबर बीड जिल्ह्यातील दूध भेसळ प्रकरणात सहभाग निष्पन्न झाल्यामुळे जामखेड तालुक्यातील एका दूध संकलन केंद्राचा परवाना तातडीने निलंबित करण्यात आला आहे. सणांच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि निकृष्ट अन्नपदार्थांची वाहतूक किंवा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर अत्यंत कठोर कारवाई करण्याचा थेट इशारा प्रशासनाने दिला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहायक आयुक्त (अन्न) सो. ह. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी उ. र. सूर्यवंशी यांच्या पथकाने सोमवारी (२१ सप्टेंबर) संगमनेर येथील ‘मे. व्ही. एस. एकदंत फुड प्रॉडक्ट्स’ या आस्थापनेवर अचानक तपासणी केली. या तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले.
तेथील अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत तीव्र संशय आल्याने पथकाने ‘काऊ घी (जार)’ आणि ‘काऊ घी (१५ किलो टिन)’ या साठ्यामधून कायदेशीर नमुने ताब्यात घेतले. या कारवाईत १ लाख ३५ हजार ५२० रुपये किंमतीचे १७६ लिटर काऊ घी जार (१ लिटरचे १७६ जार) आणि १ लाख २५ हजार ३०० रुपये किंमतीचे १७९ किलो काऊ घी टिन (१५ किलोचे १२ टिन) असा एकूण २ लाख ६० हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेले अन्न नमुने पुढील रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त होताच संबंधित दोषींवर कायद्यातील तरतुदींनुसार पुढील कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असून, या प्रकरणाचा सखोल तपास अन्न सुरक्षा अधिकारी उ. र. सूर्यवंशी करत आहेत.
तर दुसऱ्या एका कारवाईत, आष्टी (जिल्हा बीड) येथे उघडकीस आलेल्या दूध भेसळ प्रकरणात सहभाग असल्याचे सिद्ध झाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील ‘मे. भगवान कृपा दूध संकलन व शीतकरण केंद्र, खर्डा’ (मालक – हरिदास एकनाथ गोपाळघरे) या आस्थापनेचा परवाना प्रशासनाकडून निलंबित करण्यात आला आहे.
आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता अहिल्यानगर जिल्ह्यातील स्वीटमार्ट तसेच इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अस्वच्छ ठिकाणी तयार केलेले अथवा कमी दर्जाचे अन्नपदार्थ साठवणे व विकणे पूर्णपणे टाळावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. इतर राज्यांतून किंवा जिल्ह्यांतून ट्रॅव्हल्स अथवा अन्य वाहनांद्वारे निकृष्ट दर्जाच्या अन्नाची अस्वच्छ वाहतूक केल्यास केवळ विक्रेत्यांवरच नव्हे तर संबंधित ट्रॅव्हल्स एजन्सीवरही कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
जिल्ह्यात कुठेही अन्न भेसळीबाबत संशय किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी त्वरित अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त सो. ह. इंगळे यांनी केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply