अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
एखाद्या थरारक सिनेमाला शोभेल असा धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार संगमनेर शहरात समोर आल्याने संपूर्ण तालुक्यात पॉलिसी वर्दीआडून झालेल्या कृत्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पोलीस उपनिरीक्षकाच्या मदतीने मित्राच्याच विश्वासाघाताने एका निष्पाप तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा भीषण कट रचला असल्याचे समोर येत असून, याप्रकारामुळे संगमनेर पोलिसांच्या कारभारावर आणि भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घडलेल्या घटनेनुसार, जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी मित्रांनीच कट रचून काशिफ कुरेशी याच्या दुचाकीच्या डिकीत तब्बल ३९ ग्रॅम एमडी (MD) ड्रग्ज लपवून ठेवले आणि पोलिसांना खबरीद्वारे माहिती देऊन शहर पोलीस ठाण्यातील वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह छापा टाकून त्याला थेट आरोपी बनवले. परंतु, घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर या षडयंत्राचा पुरता बुरखा फाटला आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्याने यातून पोलीस उपनिरीक्षक सावंत यांचेच नव्हे तर संपूर्ण पोलीस दलाचे काळे कारनामे समोर आले आहे.
प्री प्लॅनिंगने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्याचा तपास श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी आता अहिल्यानगरच्या एलसीबीकडे सोपविला असला तरी याप्रकरणी अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. एलसीबी याचा शोध घेणार का असा देखील सवाल उपस्थित होत आहे. ३९ ग्रॅम वजनाचा हा अत्यंत धोकादायक ड्रग्जचा साठा आला कुठून आणि तो सामान्य तरुणाच्या हातात सहज कसा पोहोचला, यावरून आता मोठे वादळ उठले आहे. बाजारात हजारो-लाखो रुपयांची किंमत असणारा हा साठा पुरवणारे पडद्यामागचे ‘बडे बोके’ आणि मुख्य सूत्रधार कोण आहेत, असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत.
या संपूर्ण प्रकरणाने संगमनेर पोलीस प्रशासनाची डागळलेली प्रतिमा चव्हाट्यावर आणली आहे. जर पोलीस केवळ खबरीच्या माहितीवरून कारवाई करत असतील, तर गाडीत ड्रग्ज ठेवणारा तौसीब कुरेशी आणि त्याचे साथीदार हे केवळ प्यादे आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांचा या षड्यंत्रात सहभाग समोर येत असल्याने त्यांच्यावर, दुचाकीच्या डिक्कीत ड्रग ठेवणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल होणार का. या रॅकेटच्या मुळाशी असलेले मोठे जाळे शोधून काढणे आणि रक्षकच भक्षक बनत आहेत का याचा पर्दाफाश करणे आता अत्यंत गरजेचे बनले आहे.
घडलेल्या गंभीर प्रकारानंतर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी प्रकरणाची दखल घेत सखोल माहिती दिली असून, हा तपास संबंधित अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्याकडून काढून घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, केवळ स्थानिक पातळीवर वरवरची कारवाई न करता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी संगमनेरकर करत आहेत. निष्पाप तरुणाला अडकवणाऱ्या आणि ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या खऱ्या सूत्रधारांच्या नांग्या ठेचून त्यांना गजाआड केले, तरच पोलीस प्रशासन व न्यायव्यवस्थेवरील नागरिकांचा उडालेला विश्वास पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल. राजकीय दबावाखाली वावरणाऱ्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे सध्या तरी संगमनेरची खाकी डागाळली असल्याचे दिसते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply