पावसाच्या खंडामुळे संकट सापडलेल्या शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी शासन पूर्णपणे खंबीर असून सर्व शासकीय योजना, पीक विमा आणि कर्जमुक्तीचा लाभ प्राधान्याने दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथील शेतकरी सोपान चकोर यांच्या शेताच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन त्यांनी दुष्काळसदृश परिस्थितीमुळे झालेल्या सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी उपस्थित शेतकरी बांधवांना धीर देत, प्रशासनाने थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत पुरवावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
या पाहणी दौऱ्यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ, कृषी आयुक्त सुरज मांढरे, जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कृषी संचालक विनयकुमार आवटे, विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार धीरज मांजरे आणि तालुका कृषी अधिकारी श्रीमती बोडखे यांच्यासह महावितरण, महसूल व ग्रामविकास विभागाचे अधिकारी आणि स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाहणीदरम्यान पिंपळे गावातील काही शेतकऱ्यांच्या पीक विम्यात येत असलेल्या अडचणींची कृषिमंत्र्यांनी तातडीने दखल घेतली. कृषी व महसूल विभागाने चालू खरीप हंगामात याबाबत त्वरित कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. सोबतच, पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी वीज महावितरण विभागाने वीज पुरवठा सुरळीत ठेवावा आणि आवश्यक तेथे डीपी व ट्रान्सफॉर्मर वेळेत उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन आणि राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागामार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वंकष मदत करण्यासाठीची परिपूर्ण अधिसूचना लवकरच जारी केली जाणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. स्वतः शेतकरी असल्याने आपण या वेदना जवळून अनुभवल्या असून शेती, चारा, पाणीटंचाई व पशुपालन यावर तातडीने उपाययोजना आखण्याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा सादर केला. जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे मुग, उडीद, कपाशी, सोयाबीन, मका, तूर आणि बाजरी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या शेंगा पाण्याच्या ताणामुळे चपट्या राहून दाणे बारीक राहण्याची शक्यता निर्माण झाली असून, कपाशीवर कीड व बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.