स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड झालेल्या दिवंगत माजी खासदार बाळासाहेब थोरात यांच्या नात असलेल्या नीला विखे-पाटील या त्यांच्या राजकीय वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत. राजकीय कारकीर्दचं यश श्रेय हे त्यांचे काका, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि चुलत भाऊ, माजी खासदार सुजय विखे-पाटील घेत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. नीला यांनी माझ्या विजयाशी राधाकृष्ण आणि त्यांचा मुलगा सुजय यांचा संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दिल्याने पितापुत्र अक्षरशः तोंडघशी पडले आहेत.
नीला विखे-पाटील यांनी स्टॉकहोममधून बोलताना सांगितलं की, कुणीतरी मला सुजय विखे-पाटील हे बढाई मारत असल्याचा व्हिडिओ पाठविला. विखे-पाटील कुटुंबाच्या खासदाराचा महाराष्ट्रात पराभव झाला असला तरी त्यांच्या कुटुंबातील दुसरा सदस्य हा स्वीडनमधून खासदार झाल्याचं सुजय विखे-पाटील यांनी म्हटल्याचं व्हिडिओमध्ये दिसून आलं आहे.
नीला विखे-पाटील यांनी म्हटलं की, गेल्या काही दशकांहून अधिक काळ मी काका किंवा चुलत भावाशी संपर्कात नाही. मी भारतात नेहमी भेट देते. आता माझी खासदार म्हणून निवड झाल्यानंतर त्यांना या यशाचा फायदा घ्यायचा आहे.
त्यांचं राजकारण हे माझ्यापेक्षा वेगळं आहे. मी कधीही पक्ष बदलणार नाही. त्यांनी बदलला आहे. काकांनी फोन करून माझ्या विजयाबद्दल अभिनंदन केले. मात्र, गेली काही दशके त्यांच्याशी अथवा चुलत भावाशी कोणताही संपर्क झालेला नाही.
राधाकृष्ण विखे यांनी काय दिली होती प्रतिक्रिया- नीला विखे-पाटील यांच्या विजयाबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अभिमान असल्याचं सांगत आनंदाचा क्षण असल्याचं म्हटलं होतं. सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे त्यांना यश मिळाल्याचं मंत्री राधाकृष्ण यांनी म्हटलं होतं.
माजी खासदार सुजय विखे म्हणाले होते की, खासदारकी विखे कुटुंबाच्या रक्तात आहे. पद्मश्री कै. विठ्ठलराव विखे पाटील आणि कै. बाळासाहेब विखे पाटील यांची पुण्याई आमच्या पाठीशी आहे. एखाद्या निवडणुकीत पराभव झाला किंवा खासदारकीचं पद हातातून गेलं, तरी विखे कुटुंबाचा सार्वजनिक जीवनातील प्रवास थांबणार नाही, असं त्यांनी सूचित केलं होतं.