खेडकर दांपत्यावर गुन्हा दाखल; १३.३० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड, ACB ची मोठी कारवाई!
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक सविता तांबे यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत
वादग्रस्त ठरलेल्या माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. पूजा खेडकर यांचे वडील, निवृत्त सनदी अधिकारी दिलीप कोंडिबा खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी रात्री उशिरा पाथर्डी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
दिलीप खेडकर यांच्याकडे त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा तब्बल १०२ टक्के (दुप्पट) म्हणजे १३ कोटी ३० लाख ९१ हजार ६९६ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळल्याने ही धडक कारवाई करण्यात आली आहे.
२८ वर्षांच्या कालावधीची चौकशी– दिलीप खेडकर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात प्रादेशिक अधिकारी म्हणून कार्यरत होते व मे २०२३ मध्ये निवृत्त झाले. त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून नगर लोकसभा निवडणूकही लढवली होती. अहिल्यानगरचे पंढरीनाथ साबळे यांनी २०१२ मध्ये खेडकर यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची तक्रार दिली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १९९५ ते २०२३ या २८ वर्षांच्या कालावधीत झालेल्या आर्थिक व्यवहारांची सखोल उघड चौकशी केली.
उत्पन्नापेक्षा खर्च आणि संपत्ती दुप्पट– तपासणीदरम्यान खेडकर कुटुंबाचे एकूण अधिकृत उत्पन्न १३ कोटी २ लाख ७८ हजार ७७५ रुपये असताना, त्यांचा खर्च १५ कोटी ३३ लाख ७४ हजार ८५५ रुपये आढळला. तसेच त्यांच्याकडे १० कोटी ९९ लाख ८५ हजार ६१६ रुपयांची ज्ञात मालमत्ता मिळून आली. उत्पन्न आणि प्रत्यक्ष संपत्ती व खर्च यांचा मेळ घातला असता, तब्बल १३ कोटी ३० लाख ८१ हजार ६९६ रुपयांची (१०२ टक्के) बेहिशेबी मालमत्ता सिद्ध झाली आहे.
११ शहरांत स्थावर मालमत्तांचे जाळे– तपासात खेडकर कुटुंबाच्या नावावर अहिल्यानगर, पुणे, हवेली, पवई, बारामती, भालगाव, मुळशी, औंध, पनवेल, खरवंडी कासार आणि शिरूर कासार या ११ महत्त्वाच्या ठिकाणी कोट्यवधींच्या स्थावर मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक सविता तांबे यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.