महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. शेती पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करा, शेतकऱ्याला हेक्टरी जास्तीत जास्त कशी मदत मिळेल तसेच मदतीपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या, अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात अल निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या अनियमिततेचे संकट निर्माण झाले असून, त्याचा मोठा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि सर्वच लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करत आहेत.
या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील हिवरगाव पठार अंतर्गत येणारी सुतारवाडी, पायरवाडी, कौठे मलकापूर, कुंभारवाडी, जांभूळवाडी आणि पिंपळगाव देपा परिसरातील नुकसानग्रस्त शेतपिकांची आमदार अमोल खताळ यांनी गुरुवारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली.
यावेळी तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
खताळ म्हणाले की, पावसाने दिलेल्या प्रदीर्घ विश्रांतीमुळे तालुक्यातील अनेक भागांमध्ये मका, सोयाबीन, बाजरी यासह विविध खरीप पिके जळून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून, शासनाने या नुकसानीची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे कोणतेही निकष अथवा भेदभाव न करता सरसकट पंचनामे करावेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची सविस्तर यादी तयार करावी, यादीतून कोणीही सुटणार नाही याची अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. तसेच कार्यकर्त्यांनीसुद्धा या बाबतीत दक्ष राहावे.
शासनाच्या मदतीपासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहू नये, यासाठी महसूल, कृषी तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करावी आणि पंचनाम्याची प्रक्रिया पारदर्शक व वेगाने पूर्ण करून त्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून ही कार्यवाही कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्यात येईल. शासनाच्या मदतीपासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल. दिवाळीपर्यंत नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. – अमोल खताळ, आमदार






