महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
एका गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या आणि बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरूण उर्फ माऊली दत्तात्रय गणगे (वय ३२, रा. सुरेगाव दही, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अहिल्यानगर जिल्हयातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे व किशोर शिरसाठ यांच्या पथकाने नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त सुरू केली होती.
गस्तीदरम्यान, आरोपी अरूण उर्फ माऊली गणगे हा गावठी कट्टा बाळगून असून तो कोणताही गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.
माहिती मिळताच पथकाने नेवासा परिसरात आरोपीचा शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. त्यानंतर तांत्रिक अन्वेषण आणि गोपनीय बातमीदारांमार्फत तो पुण्यातील कोंढवा भागात असल्याची पक्की माहिती मिळाली. पोलीस पथकाने तात्काळ कोंढवा येथे जाऊन छापा टाकत आरोपीला ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे कसून चौकशी केली असता, त्याने गावठी कट्टा मीनाक्षी कलाकेंद्र, पांढरी पूल (ता. अहिल्यानगर) जवळील कच्च्या रस्त्याच्या कडेला असलेल्या एका रुईच्या झाडामध्ये लपवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळी जाऊन पांढऱ्या रंगाच्या पिशवीत गुंडाळून ठेवलेला ५० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा हस्तगत केला.
आरोपीसह जप्त मुद्देमाल एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध आर्म ॲक्ट कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply