महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
केवळ पुस्तक प्रकाशित करून थांबून चालणार नाही. आजच्या काळात पुस्तकाचे ऑडिओ स्वरूप तयार करण्याबरोबरच त्यातील छोट्या-छोट्या कथा, प्रसंग आणि विचार रील्स तसेच लघु व्हिडिओंच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. आजचा जमाना रील्सचा आहे. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याकडे असलेला समृद्ध वैचारिक आणि ऐतिहासिक ठेवा प्रभावीपणे समाजापर्यंत नेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. राहुल कोसंबी यांनी अनुवादित केलेल्या ‘जवाहरलाल हाजिर हो’ या पुस्तकाचे प्रकाशन थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रमुख वक्ते पत्रकार संजय आवटे, प्रा. रंगनाथ पठारे, डॉ. राहुल कोसंबी, प्रकाशक प्रमिला नारायण, डॉ. श्रीरंजन आवटे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, ‘जवाहरलाल हाजिर हो’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी निवडलेला दिवस अत्यंत औचित्यपूर्ण आहे. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि लालबहादूर शास्त्री या तीन व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा आणि कार्याचा या निमित्ताने पुन्हा एकदा विचार करण्याची संधी मिळते. महात्मा गांधींनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला नेतृत्व दिले. सत्य आणि अहिंसेचा विचार जगासमोर ठेवला. मानवतेला साद घालणारा हा विचार घेऊन पंडित जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले.
नेहरू यांनी स्वातंत्र्यलढ्यात दीर्घकाळ तुरुंगवास भोगला. नगरच्या भुईकोट किल्ल्यातील त्यांच्या वास्तव्यात ‘भारताचा शोध’ अर्थात ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला गेला. महात्मा गांधींच्या विचारांतून प्रेरणा घेऊन नेहरू यांनी आधुनिक भारताच्या उभारणीला दिशा देण्याचे काम केले. गांधींच्या विचारांचा पुढचा आवाज म्हणून नेहरूंकडे पाहिले जात असल्याचेही थोरात यांनी नमूद केले.
लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचा उल्लेख करताना थोरात म्हणाले की, त्यांचे पंतप्रधानपदाचा कालखंड तुलनेने कमी असला तरी स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग आणि त्याग मोठा होता. अत्यंत कठीण परिस्थितीतही त्यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले. शास्त्री यांच्या जीवनातील प्रसंगातून त्यांच्या विचारांची, कर्तव्यनिष्ठेची आणि चारित्र्याची उंची दिसून येते, असे त्यांनी सांगितले.
आजच्या डिजिटल युगातील बदलत्या माध्यमांचा उल्लेख करताना थोरात म्हणाले की, अलीकडच्या काळात आपण ऑडिओ माध्यमातून अनेक पुस्तके ऐकू शकतो. प्रवास करताना किंवा इतर कामे करताना पुस्तक ऐकण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ‘जवाहरलाल हाजिर हो’ या पुस्तकाचेही ऑडिओ रूपांतर करणे आवश्यक आहे. मात्र, त्यावरही थांबून चालणार नाही. पुस्तकातील महत्त्वाचे प्रसंग, कथा आणि विचार छोटे-छोटे व्हिडिओ व रील्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत.
आज सोशल मीडिया आणि रील्सच्या माध्यमातून काही वेळा चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती वेगाने पोहोचते. रात्री काही तास पाहिलेल्या रील्सचा प्रभाव दुसऱ्या दिवशीच्या विचारांवर पडू शकतो. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा वापर आपणही प्रभावीपणे केला पाहिजे. आपल्या विचारांचा आणि इतिहासाचा समृद्ध ठेवा नव्या माध्यमांमधून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे थोरात यांनी सांगितले.
इतिहासाच्या दस्तऐवजीकरणाचे महत्त्व अधोरेखित करताना थोरात म्हणाले की, एखाद्या विचाराचा आणि व्यक्तिमत्त्वाचा इतिहास पुढे नेण्यासाठी त्याचे लेखन आणि दस्तऐवजीकरण अत्यंत आवश्यक आहे. ‘रामायण लिहिले गेले म्हणून रामाचा इतिहास आज आपल्यापर्यंत पोहोचला,’ असे उदाहरण देत त्यांनी दस्तऐवजीकरणाची ताकद स्पष्ट केली.
आपल्याकडे मोठी वैचारिक परंपरा, संत साहित्य, समाजसुधारकांचे लेखन आणि समृद्ध इतिहास आहे. मात्र हा ठेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आपण कमी पडत आहोत. आपण कमी बोलतो, कमी संवाद साधतो आणि उपलब्ध साधनांचा पुरेसा वापर करत नाही, ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. दुसऱ्या बाजूने सोपे माध्यम आणि प्रभावी संवादपद्धती वापरून विचार लोकांपर्यंत पोहोचविले जात आहेत. त्यामुळे आपल्याकडे असलेले वैचारिक भांडवल पुस्तक, ऑडिओ, रील्स आणि डिजिटल माध्यमे यांचा एकत्रित वापर करून विचारांची ही परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवली तर त्याचा व्यापक परिणाम होऊ शकतो. आपण आपापल्या क्षेत्रातून ही जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply