महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी येथे मुंबई पोलिसाच्या शेतात वाळत घातलेल्या बाजरीच्या कणसांवर बीबे, लिंबू आणि कवड्या ठेवून जादूटोणा व अघोरी कृत्य करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मंगेश सुभाष गोंदके याच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेळकेवाडी येथील रहिवासी ज्योती बाळासाहेब कडू यांचे पती मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. कडू यांच्या शेताजवळच संशयित आरोपी मंगेश गोंदके याचे शेत आणि घर आहे. आरोपी गोंदके याने दोन वर्षांपूर्वी कडू यांच्या शेतातील वालवडीची दोरी कापून नुकसान केले होते, तर सहा महिन्यांपूर्वी कडू यांच्या घरातील वापरातील कपडे चोरीला गेले होते. या कपड्यांचा वापर करून गोंदके हा करणी आणि जादूटोणा करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय कडू कुटुंबाला आधीपासूनच होता.
काही दिवसांपूर्वी कडू यांनी आपल्या शेतातील बाजरीची कणसे कापून घराबाजूला वाळण्यासाठी ठेवली होती. गुरुवारी रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास कुत्रे भुंकल्याचा आवाज आल्याने ज्योती कडू यांनी खिडकीतून बाहेर पाहिले. संशय आल्याने त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता, मंगेश गोंदके हा बाजरीच्या कणसांजवळ बसलेला दिसला. ज्योती कडू यांनी तात्काळ शेजारी राहणाऱ्या बहिणीला व नातेवाईकांना हाक मारली, त्यामुळे पकडले जाण्याच्या भीतीने गोंदके तेथून पळून गेला.
त्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी एकत्र येऊन गोंदके बसलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तेथे बाजरीच्या कणसांजवळ बीबे, घोंगडीचे केस, लिंबू, कवड्या आणि इतर संशयास्पद साहित्य आढळून आले. हे साहित्य जादूटोणा आणि अघोरी कृत्यासाठीच ठेवल्याचे स्पष्ट झाल्याने कडू कुटुंबाला मोठा मानसिक त्रास व भीतीचा सामना करावा लागला. या घटनेनंतर ज्योती कडू यांनी घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मंगेश गोंदके याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब बोरसे करत आहेत.