महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महामार्गावरून पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत निष्काळजीपणे कंटेनर घुसवून चार जणांना चिरडून तब्बल १५ ते १६ वारकऱ्यांना गंभीर जखमी करणाऱ्या आरोपी चालकाला गुन्हा सिद्ध झाल्याने संगमनेर न्यायालयाने ३ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. छोटेलाल अलगु पाल असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. नेमकी घटना काय होती?
३ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० वर खंदरमाळवाडी शिवारात वारकऱ्यांची दिंडी पायी चालली होती. यावेळी आरोपीने अत्यंत बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे आपला कंटेनर थेट दिंडीत घुसवला. कंटेनर खाली चिरडले गेल्याने चार निष्पाप वारकऱ्यांचा या घटनेमध्ये मृत्यू झाला होता. हा कंटेनर पालखी रथावर जाऊन आदळला, यामध्ये सुमारे १५ ते १६ वारकरी गंभीर जखमी झाले होते. घटनेनंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चालकाला स्थानिक गावकऱ्यांनी पकडून घारगाव पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
घारगाव (संगमनेर) पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम ३०४, २७९, ३३७, ३३८ व मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष बी. खेडकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास केला व आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. आर. नेरलेकर यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली. फिर्यादी, साक्षीदार, पंच आणि तपास अधिकाऱ्यांनी मांडलेले भक्कम पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी छोटेलाल पाल याला कलम २३५(२) अन्वये विविध कलमांखाली दोषी ठरवून शिक्षा सुनावली.
यात भारतीय दंड विधान कलम ३०४ खाली ३ वर्षे सश्रम कारावास, कलम ३३८ खाली १ वर्ष सश्रम कारावास, कलम ३३७ खाली ५ महिने सश्रम कारावास, कलम २७९ खाली ४ महिने सश्रम कारावास तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ आणि १३४(अ)(ब)/१७७ अन्वये प्रत्येकी २ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी चालकाने या सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहे. या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती रेश्मा जाधव यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज पाहिले. तसेच घारगाव पोलीस ठाण्याचे पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार प्रवीण डावरे आणि सहाय्यक फौजदार सुरेश टकले यांनी खटल्याच्या यशासाठी मोलाची भूमिका बजावली. गुन्हा सिद्ध करण्यात यश मिळवल्याबद्दल पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे आणि पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोराडे यांनी तपास पथकाचे व सरकारी वकिलांचे विशेष अभिनंदन केले आहे.