संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे आगारातील एकूण पर्यावरणपूरक बसेसची संख्या ११ वर पोहोचली असून प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संगमनेर आगारासाठी एकूण २५ इलेक्ट्रिक ‘शिवाई’ एसटी बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. आमदार अमोल खताळ यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे या आधुनिक बसेस आगाराला उपलब्ध झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात ६ बसेस संगमनेरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे आमदार खताळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते, या बस सध्या पुणे, पंढरपूर आणि तुळजापूर या लांब पल्ल्याच्या मार्गांवर धावत आहेत.
आता नव्याने दाखल झालेल्या ५ बसेस जिल्ह्यांतर्गत विविध मार्गांवर चालविण्यात येणार आहेत, यामुळे स्थानिक प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. या इलेक्ट्रिक बसेसच्या वापरामुळे एसटी महामंडळाचा इंधनावरील खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार असून वायुप्रदूषण रोखण्यासही मोठी मदत मिळणार आहे. उर्वरित १४ बसेस टप्प्याटप्प्याने संगमनेर आगारात दाखल होणार असून, त्यानंतर परिसरातील बससेवेचा आणखी विस्तार होणार आहे.