नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती
दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम राबवून लोकसहभागातून जलसंधारणाची कामे हाती घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे संकटात सापडलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारच्या माध्यमातून दिवाळीपूर्वी आर्थिक मदत दिली जाईल, अशी महत्त्वाची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे मळगंगा माता नवरात्रोत्सवानिमित्त कन्याकुमारी ते सावरगाव तळ आणलेल्या पवित्र ज्योतीचे स्वागत करताना ते बोलत होते.
खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार खताळ म्हणाले की, शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण होताच बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून मदतीचा हात दिला जाईल. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ तर यंदा पावसाने ओढ दिल्याने कोरड्या दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे.
यावेळी बोलताना त्यांनी निसर्गाची परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी देव, देश आणि धर्म यांचे महत्त्व तरुण पिढीला समजावून सांगून संस्कृतीतील परंपरा जपण्याचे आवाहन केले. तसेच दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम राबवून लोकसहभागातून जलसंधारणाची कामे हाती घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
या प्रसंगी नवरात्र उत्सव तरुण मित्र मंडळ, महायुतीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.