महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या दुष्काळाची अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याचे पाणी आणि पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीमध्ये शासनाने पंचनाम्यांचे सोपस्कार करत वेळ न घालवता सरसकट सर्व दुष्काळग्रस्तांना भरीव आर्थिक मदत केली पाहिजे, अशी आग्रही मागणी करत सध्याचे सरकार केवळ घोषणाबाजी करत असून, आता घोषणांची नव्हे तर प्रत्यक्ष अंमलबजावणीची गरज असल्याचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील हिवरगाव पठार, जांभुळवाडी, मांडवे, बिरेवाडी, कवठे मलकापूर, सुळकेवाडी, चौधरवाडी, कणसेवाडी, कुंभारवाडी, दरेवाडी, रणखांब आणि पिंपळगाव देपा या विविध गावांमधील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन बाळासाहेब थोरात यांनी परिस्थितीची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी सोयाबीन, भुईमूग आणि बाजरी या करपून गेलेल्या पिकांची पाहणी करत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, अल-निनोच्या प्रभावामुळे राज्यभरात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. हाताशी आलेली पिके पूर्णपणे जळून गेल्यामुळे सोयाबीन काढण्याचीही परिस्थिती उरलेली नाही. शेतीतून कोणतेही उत्पन्न मिळण्याची शक्यता नसून, चाऱ्याअभावी पशुधनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतमजुरांच्या हाताला काम उरलेले नसल्याने त्यांच्यावर दोन वेळेच्या अन्नाची भ्रांत निर्माण झाली आहे.
याशिवाय ग्रामीण भागातील अकुशल कामगारांचे मागील सहा महिन्यांचे वेतन शासनाने थकवले आहे. संजय गांधी निराधार योजनेचे पैसेही गेल्या सहा महिन्यांपासून मिळालेले नाहीत. हातावर पोट असणाऱ्या गरीब नागरिकांचे पैसेही देऊ न शकणारे हे सरकार पूर्णपणे कुचकामी ठरले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने रोजगार, पाणी व चाऱ्याची व्यवस्था करून सरसकट मदत दिली पाहिजे.
पाहणीदरम्यान अनेक शेतकरी महिला आणि युवकांनी थोरात यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. साहेब, हे सरकार काही कामाचे नाही, तुम्हीच आम्हाला या संकटातून वाचवा, अशा भावना व्यक्त करताना अनेक महिलांच्या डोळ्यांत अश्रू आले. यावर बाळासाहेब थोरात यांनी सर्वांना धीर देत, काँग्रेस पक्ष सदैव दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील आणि तुमच्या हक्कासाठी संघर्ष करेल, असा विश्वास दिला.
या पाहणी दौऱ्यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमवेत सभापती शंकरराव खेमनर, बाळासाहेब सागर, मीराताई शेटे, जयराम ढेरंगे, सुजित खेमनर, सुदाम सागर, शिवाजी साकुरे, शशिकांत बेरड, लक्ष्मण गीते, पांडुरंग सागर, बाबासाहेब भोसले, भास्कर कारंडे, निवृत्ती गिऱ्हे, राहुल गंभीरे, रोहिदास मुंडे, भाऊसाहेब गांजवे, जाकीर मोमीन, पोपट घाडगे, के. के. पावडे, सरपंच हौशीराम खेमनर, तुकाराम गुळवे, साहेबराव बारवे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिल्लीतील आंदोलनावरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर-शेतकरी नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी दिल्ली येथे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात सहभाग घेतला होता. यापूर्वीही त्यांनी राज्यात दुष्काळ जाहीर करावा यासाठी संगमनेरमध्ये भव्य मोर्चा काढला होता, याची दखल घेत शासनाला दुष्काळ जाहीर करावा लागला. मुंबई आणि पुण्यातील विविध आंदोलनांनंतर, दिल्लीहून रात्री उशिरा परतल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी कोणताही विश्रांती न घेता सकाळी आठ वाजताच थेट पठार भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांची भेट घेतली.