महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन-
देशभरात वेगवेगळ्या मुद्यांवरून श्रेय लाटण्याचे प्रकार सुरू असताना, जिल्ह्यात आता निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटण्यासाठी काही जण पुढे सरसावले आहेत. मात्र, धरण उभे करताना आणि पाण्याचा थेंब दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी नेमका कोणाचा घाम गाळला गेला, हे संगमनेर-अकोलेच्या जनतेला चांगलेच ठाऊक आहे, असा तुफान टोला लगावत संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी श्रेयवाद्यांचे बुरखे फाडले आहेत.
देशभरात चंदाचोर, वोटचोरीचे पेव फुटलेले असताना अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा आता क्रेडिट चोरीच्या घटना समोर येत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी निळवंडे धरणावरून आता जिल्ह्याच्या राजकारणात श्रेयवादाची नवी रणधुमाळी पेटली आहे. निळवंडे धरण म्हणजे केवळ सिमेंट-काँक्रीटची भिंत नाही, तर पिढ्यान्‌पिढ्या पावसाच्या प्रतीक्षेत राहिलेल्या शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांना लोकनेते बाळासाहेब थोरात आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी मिळवून दिलेला न्याय आहे.
वर्षानुवर्षे रखडलेल्या निळवंडे प्रकल्पाला गती देऊन त्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी राजकीय इच्छाशक्ती, सातत्य आणि मोठी दूरदृष्टी दाखवली. अनेक राजकीय विरोध आणि प्रशासकीय अडथळ्यांवर मात करत त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावला. मात्र, आज शासकीय प्रोटोकॉलच्या नावाखाली उद्घाटनाचे फलक आणि कोनशिलेवर स्वतःची नावे झळकवून, या संघर्षाचा इतिहास पुसून स्वतःला जलनायक ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न काही मंडळींकडून सुरू आहे. हा प्रकार सरळ सरळ जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करणारा असल्याचा संताप शेलकर यांनी व्यक्त केला.
निळवंडे धरण ही केवळ सिमेंट-काँक्रीटची भिंत नसून, पिढ्यान्‌पिढ्या पावसाच्या प्रतीक्षेत राहिलेल्या शेतकर्‍यांच्या आशा-आकांक्षांना मिळालेला न्याय आहे. ‘आधी पुनर्वसन, नंतर धरण’ या संवेदनशील धोरणाचा पुरस्कार करत बाळासाहेब थोरात, मधुकरराव पिचड यांनी विस्थापितांच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. एकीकडे निळवंडेऐवजी म्हाळादेवी येथे धरण व्हावे, असा अट्टाहास धरणाऱ्यांनी निळवंडेऐवजी म्हाळादेवी येथे धरण झाले असते, तर संगमनेरच्या ग्रामीण भागाला आणि शहराला आज मिळणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन कसे झाले असते, त्यावेळी संगमनेरच्या पाण्याचे काय झाले असते, याचे उत्तर दिले पाहिजे. केवळ पर्यायी जागेची मागणी करणे सोपे असते; पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी प्रचंड पाठपुरावा करावा लागतो, अशी ठणकावून आठवण त्यांनी करून दिली.
संगमनेर शहर आणि ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची भीषण गरज ओळखत निळवंडे धरणातून सुमारे ६७ किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनद्वारे पाणी आणण्याचा दूरदृष्टीचा निर्णय घेण्यात आला. या कामाच्या नियोजनात आणि पाठपुराव्यात बाळासाहेब थोरात यांच्या योगदानाची दखल घेतलीच पाहिजे. पावसाचे प्रमाण कमी असताना पाण्याचे योग्य नियोजन, उपलब्ध साठ्याचे संरक्षण आणि भविष्यातील गरजांचा विचार किती महत्त्वाचा आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. निळवंडेच्या पाण्याच्या नियोजनात संगमनेरच्या हक्काच्या पाण्याचा विचार करणारे नेतृत्व म्हणून थोरात यांच्याकडे पाहिले जाते.
आज दुष्काळी पट्ट्यात निळवंडेचे पाणी खेळत असल्यामुळे ग्रामीण भागाच्या आणि शेतकर्‍यांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडत आहे. परंतु, राजकारणात संकटाच्या काळात नेहमीच बाजूला राहणारे आणि निवडणुका जवळ आल्यावर श्रेय घेण्यासाठी सर्वात पुढे धडपडणारे लोक आता कोनशिलेवर नावे कोरत सुटले आहेत. कोनशिलेवर नावे बदलली तरी इतिहासातील योगदानाची नोंद कधीही बदलता येणार नाही.
एखाद्या सरकारी कार्यक्रमात उपस्थित राहणे, उद्घाटनाच्या फलकावर नाव झळकवणे किंवा कोनशिलेवर स्वतःचे नाव कोरणे, यामुळे एखादी व्यक्ती प्रकल्पाची जनक ठरत नाही. प्रकल्पासाठी कोणी संघर्ष केला, कोणी अडथळे दूर केले, कोणी निधी आणि प्रशासकीय मंजुरीसाठी पाठपुरावा केला आणि शेवटी सामान्य जनतेला त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणी प्रयत्न केले, यावर खरे योगदान ठरते. अशा थेट शब्दात प्रहार करत श्रेयवाद घेणाऱ्यांना अमोल शेलकर यांनी खडेबोल सुनावले आहेत.
निळवंडे धरण आणि कालव्यांच्या उभारणीतील बाळासाहेब थोरात यांच्या योगदानाचा इतिहास जनतेला माहीत आहे. त्यामुळे कोनशिलांवर नावे बदलली, तरी जनतेच्या मनातील योगदानाची नोंद बदलता येणार नाही. ‘ये पब्लिक है, सब जानती है!’ या शब्दांत अमोल शेलकर यांनी श्रेयवाद्यांना जोरदार टोला लगावत, निळवंडे धरणाच्या संघर्षाचा आणि कालव्यांच्या माध्यमातून दुष्काळी भागात पाणी पोहोचवण्याच्या प्रयत्नांचा इतिहास पुसण्याचा कोणी प्रयत्न करू नये, इतिहास साक्षी असल्याने कोणी कितीही श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला तरी जनतेला मात्र सर्व माहीत असल्याचे शेलकर यांनी शेवटी म्हटले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply