महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरूपात धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले असून शिवसेना या एका नावालाही दोन्ही गटांसाठी परवानगी नाकारली आहे.
यामुळे ठाकरे-शिंदे गटाचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव काय असेल, हे आता निवडणूक आयोगाच्या हाती राहणार आहे. या प्रकारामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात घडणाऱ्या घडामोडींवर भाष्य करण्यास मनसैनिकांना राज ठाकरेंनी बंदी घातली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या संदर्भात ट्विट करत आपली भूमिका योग्य वेळेस मांडणार असल्याचे सांगितले आहे. शिवसेनेतून एक मोठा गट घेऊन बाहेर पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ चिन्हच गोठविले नाही तर शिवसेना देखील संपविल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. या संदर्भात राजकीय गोटातून विविध क्रिया प्रतिक्रिया येत असल्या तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र या संदर्भात वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांना ट्विटद्वारे आवाहन केले आहे की,
सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये. मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेल.
ठाकरे यांचे हे ट्विटर ट्विट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले असून शिवसेनेतील या घडामोडीवर राज ठाकरे यांची नेमकी भूमिका काय असेल, आपल्या सडेतोड भूमिकेतून ते कोणावर शरसंधान साधणार याचे अंदाज बांधले जात आहेत.

