महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
५० खोक्यांच्या आरोपावरून आमदार बच्चू कडू आणि रवी राणा या सत्ताधारी घटक पक्षातील दोन नेत्यांमधील वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. या वादात आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी करणार आहेत. त्यासाठी त्यांनी या दोन्ही आमदारांना मुंबईत दुपारी तीन वाजता बोलावून घेतले आहे. मुख्यमंत्री शिंदे या दोन नेत्यांमधील वादात नेमका काय तोडगा काढतात याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेतील मोठ्या बंडखोरी नंतर प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आमदार बच्चू कडू हे देखील शिंदे गटासोबत गुवाहाटीमध्ये होते. यावेळी आमदार फोडाफोडीत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा राज्यात सर्वत्र असताना भाजपाशी सलगी असलेले आमदार रवी राणा यांनी देखील बच्चू कडू यांच्यावर पन्नास खोके घेतल्याचा आरोप केला आहे.
त्यामुळे राणा यांनी हा आरोप सिद्ध करावा, या मागणीसाठी कडू पोलीस ठाण्याची पायरी देखील चढले आहेत.
विदर्भातील या दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असलेले वाद विवाद टोकाला गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामागील वस्तुस्थिती जाहीर करण्याची मागणी आमदार कडू यांनी केलेली आहे.
तसेच ते न्यायालयात देखील तक्रार करणार आहेत. म्हणून या वादामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी करत असून या दोन्ही नेत्यांना त्यांनी आज दुपारी तीन वाजता आपल्या ‘वर्षा’ निवासस्थानी बोलविले आहे.
त्यामुळे गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या या दोन नेत्यांमधील वादावर आज तोडगा निघणार का? याकडे राज्यातील राजकारण्यांचे लक्ष लागले आहे.
शिंदे गटासोबत येण्यासाठी बच्चू कडूंनी पैसे घेतले, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. त्यावर स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. माझ्यासोबत कोणताही आमदार पैशासाठी आला नाही. तर, महाराष्ट्राच्या विकासासाठी, स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारासाठी आमदार माझ्यासोबत आले, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.


