महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
टाटा एअरबससह चार मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहे. त्या पाठोपाठ नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प देखील हैदराबादला गेल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राज्यात मोठा प्रकल्प येईल असा लॉलीपॉप दाखविला जात असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
माध्यमांशी साधलेल्या संवादावेळी सुळे बोलत होत्या. पुढच्या वेळी यापेक्षा मोठा प्रकल्प राज्यात येईल, असा लॉलीपॉप दाखविला जात आहे. मी तर म्हणते की, सगळेच प्रकल्प राज्यात यायला हवेत. मात्र राज्यात ईडी सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे प्रकल्प येथून राज्याबाहेर जात आहे.
हे सरकार सत्तेत येऊन तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला असला तरी राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पाचे खापर महाविकास आघाडीवर फोडले जात आहे.
विद्यमान सत्ताधारी ईडी सरकारमधील मंत्री तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात देखील मंत्री होते, तेव्हा ते झोपलेले होते काय? असा देखील सवाल सुळे यांनी उपस्थित केला. 
गत काही दिवसांपासून राज्यात जे काही वातावरण सुरू आहे ते अतिशय दुर्दैवी आहे. तू-तू-मै-मैं करण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त प्रकल्प कसे येतील, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी सर्व पक्ष बैठक बोलवायला हवी असे देखील त्या म्हणाल्या.


