महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी साडेचार वाजता प्रसिध्द शेतकरी कवी प्रा. संतोष पवार यांच्या काव्यसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विधिमंडळ पक्षनेते व भारत जोडो यात्रेचे समन्वयक माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व विधान परिषद सदस्य आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत हा अभिवादन व काव्यसंध्या कार्यक्रम होणार असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी दिली.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्थेच्यावतीने दरवर्षी यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या पुण्यस्मरण दिनी अभिवादन केले जात असून या निमित्त महाराष्ट्रातील नामवंत कवी, साहित्यीक यांची व्याख्याने आयोजित केली जातात. शुक्रवारी अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या प्रांगणात ‘यशवंततिर्थ’ येथे अमृतवाहिनीच्या विश्वस्त शरयु देशमुख, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, लक्ष्मण कुटे, बाजीराव खेमनर, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, विश्वस्त आर. बी. सोनवणे आदींसह विविध संस्थाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त साहित्यप्रेमी व नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

