महाराष्ट्र संवाद न्यूज, अकोले
अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथील रहिवासी रोहिदास गवराम पांडे यांच्या अकस्मात मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना पांडे यांनी काढलेल्या ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेचा धनादेश नुकताच प्रदान करण्यात आला. श्रीरामपूर डाक विभागाचे अधीक्षक हेमंत खडकेकर यांच्या हस्ते पांडे यांच्या पत्नी निर्मला पांडे यांना प्रदान करण्यात आला.
रोहिदास पांडे यांनी कुंभेफळ (ता. अकोले) येथील पोस्टमध्ये ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयाची विमा पॉलिसी घेतली होती. दुर्दैवाने काही महिन्यांपूर्वी त्यांचा अकस्मात मृत्यू झाला. या विमा पॉलिसीचा लाभ मिळण्यासाठी पांडे यांच्या वारसांनी आवश्यक ती कागदपत्रे टपाल विभागाकडे दाखल केली होती. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर त्यांचा दावा मंजूर करण्यात आला.
नुकताच पांडे यांच्या वारस पत्नी निर्मला पांडे यांना डाक विभागाचे अध्यक्ष हेमंत खडकेकर यांच्या हस्ते ५ लाख २३ हजार ७६३ रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी अकोले टपाल विभागाचे पोस्टमास्तर भाऊराव मधे, विमा विकास अधिकारी विजय कोल्हे, सुभान इनामदार, बाळू तातळे, निलेश भवारी, वैभव वाकचौरे, विशाल मधे आदी उपस्थित होते.
श्रीरामपूरचे पोस्ट मास्तर सागर आढाव, सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर प्रमुख राजेंद्र गायकवाड, पुनम गवारे व अकोले पोस्ट मास्तर भाऊराव मधे आदींचे सहकार्य लावण्याचे निर्मला पांडे यांनी सांगितले.
भारतीय डाक विभागाने १९९५ मध्ये खास ग्रामीण भागातील व्यक्तींसाठी ग्रामीण डाक जीवन विमा योजना आणली. सर्वात कमी हफ्ता व सर्वात जास्त बोनस यामुळे ग्रामीण भागात हा विमा लोकप्रिय आहे. ग्राहकाभिमुख सेवांमुळे जनमानसांत टपाल विभागाबद्दल चांगली प्रतिमा निर्माण होत आहे. या योजनेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा.
हेमंत खडकेकर, डाक अधीक्षक, श्रीरामपूर विभाग

