महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : शहरालगत खांडगाव फाटा येथे भरधाव पीकअप आणि रिक्षाच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले. मृतात एका महिलेचा समावेश आहे.
सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील खांडगाव फाटा येथे हा अपघात झाला. आशाबाई बबनराव चोथे (वय ४५, रा. आंबाईमाता मंदिर, पुणे), राजेंद्र उत्तम शेळके (वय ४५ रा. आंबेगाव, पुणे) अशी मृतांची नावे असून दत्ता पांडुरंग वराडे, कैलास चोथे, आशा चोथे, राजू शेळके यांचा जखमींमध्ये समावेश आहे.
एम.एच. १७ सीव्ही ००२६ या क्रमांकाची पिकअप नासिक-पुणे मार्गावरून पुण्याच्या दिशेने जात होती. यावेळी खांडगाव फाट्यावर समोरून संगमनेरच्या दिशेने येत असलेली रिक्षा आणि पिकअप यांची समोरासमोर जोराची धडक झाली. जोराच्या धडकेने अपघातात दोन्ही वाहने चक्काचुर होऊन पलटी झाली. त्याच दरम्यान तेथून जात असलेली एक स्विफ्ट कार अपघातग्रस्त वाहनांवर धडकल्याने तिचे देखील मोठे नुकसान झाले. अपघातात वाहनांमधील सहा जण जखमी झाले. त्यांना तातडीने स्थानिक नागरिकांनी मदत करत रुग्णालयात पोहोचविले. मात्र त्यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी एकनाथ खाडे, चालक सुरेश गोलवड तातडीने घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात नेण्यास पोलिसांना स्थानिक नागरिकांनी केलेल्या मदत कार्यामुळे जखमींचे प्राण वाचण्यास मदत झाली.

