महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क
संगमनेर : नगरपालिकेच्या ड्रेनेजचे काम करताना म्हाळुंगी नदीवरील स्वामी समर्थ मंदिरालगतच्या पुलास तडे गेल्याने पुल खचला. त्यामुळे पुलावरील रहदारी बंद करण्यात आली असल्याने परिसरातील नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे खासदार साहेबांनी या पुलाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका अल्पना तांबे यांनी केली आहे.
या प्रभागातील माजी नगरसेविका तांबे यांनी शिर्डी मतदार संघाचे शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांची भेट घेत ही मागणी केली आहे. म्हाळुंगी नदीवरील पूल खचल्याने गेल्या काही महिन्यापासून वाहतुकीसाठी तसेच नागरिकांना पायी येण्या-जाण्यासाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे साईनगर, घोडेकर मळा, पंपिंग स्टेशन या परिसरातील नागरिकांसह दिगंबर गणेश सराफ विद्यालय व देवेंद्र ओहरा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची, केशवतीर्थावर तसेच परिसरातील मंदिरात जाणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.
पुलावरील वाहतूक बंद असल्याने या परिसरातील नागरिक व शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दूरच्या रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे खासदार लोखंडे यांनी यात लक्ष घालून कोणत्याही सरकारी निधीतून हा पूल बांधून देण्याची मागणी तांबे यांनी केली आहे.

